Gautam Gambhir And Hardik Pandya : भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-२० मालिका ३-० अशा फरकाने संपली. पाहुण्या भारतीय संघाने वर्चस्व गाजवत यजमानांना पराभवाची धूळ चारली. अखेरचा सामना जिंकून श्रीलंकेचा संघ अस्तित्वाच्या लढाईत विजय संपादन करेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी गोलंदाजीत कमाल करून सामना फिरवला. भारताने अखेरच्या २ षटकांत ४ बळी घेत अखेरचा सामना अनिर्णित केला. मग सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून पुन्हा एकदा यजमानांना पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १३७ धावा केल्या होत्या.
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने २० षटकांत ८ बाद १३७ धावा केल्याने सामना अनिर्णित झाला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने दोन गडी गमावून अवघ्या २ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सुपर ओव्हर टाकली. तीन चेंडूत २ धावा देऊन त्याने २ बळी घेतले. मग ३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि हार्दिक पांड्या यांनी संघाचे कौतुक केले. याची झलक बीसीसीआयने शेअर केली आहे. गंभीर म्हणाला की, ट्वेंटी-२० मालिका जिंकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. खासकरून सूर्यकुमार यादवचे... कारण त्याने चांगल्या पद्धतीने कर्णधारपद सांभाळले. कठीण परिस्थितीत संयम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हा सामना जिंकता आला. जेव्हा तुम्ही अखेरपर्यंत लढत राहता तेव्हाच असे रंगतदार सामने होत असतात. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव अतिशय महत्त्वाची असते. परिस्थितीनुसार रणनीतीत कसा बदल करायचा हे या सामन्यातून शिकायला मिळाले. यातील काही खेळाडू वन डे मालिकेचा हिस्सा नाहीत. मोठ्या कालावधीपर्यंत त्यांना विश्रांती मिळत आहे. ते बांगलादेशविरूद्धच्या मालिकेतून कमबॅक करतील असा मला विश्वास आहे. त्यांना मी एकच सांगेन की, फिटनेसवर काम करत राहा... पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन.
हार्दिक पांड्याने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खेळीला दाद दिली. सुरुवातीला फलंदाजी करताना खूप अडचणी आल्या. पण, २ फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि रियान पराग यांनी डाव सावरला. कठीण परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी चांगली खेळी केली. म्हणूनच सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचता आले आणि गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी मिळाली. वॉशिंग्टन सुंदरने चांगली कामगिरी केली. सूर्यानेही अप्रतिम खेळ केला. गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. हे भविष्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत हार्दिक पांड्याने संघाचे कौतुक केले.