जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज ठरल्याप्रमाणे मैदानात उतरला. यावेळी धोनीचा पहिला लूक पाहण्यााठी चाहते अतूर झाले होते. आपल्या या लाडक्या माहीचे जोरदार स्वागत चाहत्यांनी केले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळत आहे.
धोनी आज चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्डेडियमवर सरावासाठी उतरला. यावेली धोनीला पाहण्यासाठी चाहते आतूर झाले होते. धोनीने मैदानात पाय ठेवताच त्याच्या नावाचा जयघोष मैदानात सुरु झाला. धोनी सरावाला सुरुवात करेपर्यंत चाहत्यांनी धोनीच्या नावाची गर्जना सुरुच ठेवली होती. धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असून यावेळी तो संघाला जेतेपद जिंकवून देणार का, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असेल.
धोनीला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरागमन करायचे असेल, तर त्याला एक गोष्ट निश्चितच करावी लागेल. धोनीला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल, असे म्हटले जात आहे. आयपीएलमध्ये धोनीनं चांगली कामगिरी केल्यास त्याचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. धोनीला सेंट्रल करार न देऊन बीसीसीआयनं जेवढे सामने खेळाल, तेवढंच मानधन मिळेल असे संकेत दिले आहेत. करारामधून वगळले म्हणजे धोनी भारताकडून खेळू शकत नाही, असा याचा अर्थ होत नाही.
बीसीसीआयने जाहीर केलेला करार हा सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. धोनी सप्टेंबर २०१९ पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण धोनी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकतो. हा विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावेळी बीसीसीआयचे नवीन करार करावा लागणार आहे. त्यामुळे धोनी हा आगामी करारामध्ये आपल्याला दिसू शकतो.
धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. पंतला बऱ्याच संधी देण्यात आल्या. पण या संधीचा फायदा पंतला घेता आला नाही. त्यामुळे पंत सध्या संघाच्या बाहेर आहे. सध्याच्या घडीला भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी लोकेश राहुलवर सोपवण्यात आली होती. धोनीने आता आयपीएलवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे धोनीने आयपीएलच्या सरावाची तारीखही ठरवली होती. धोनी २ मार्चला आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सरावासाठी मैदानात उतरणार होता.