भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं कर्णधार केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांच्या जोरावर १३९ धावांचे माफक लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी न्यूझीलंडनं यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. फायनलसाठीची ही त्यांची पूर्वतयारी होती. दुसरीकडे मात्र टीम इंडियाला आपापसात संघ तयार करून तीन दिवसांचा सराव सामना खेळावा लागला. त्यावरून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नाराजी व्यक्त केली होती. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तातडीनं त्याची दखल घेतली अन् इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाशी ( ECB) चर्चा सुरू केली आहे.
WTC Final : भारतीय संघाला आणखी एक धक्का, प्रमुख गोलंदाजाच्या बोटांवर लागले टाके!
आधीच्या नियोजनानुसार भारत आणि भारत अ यांच्यात सराव सामने होणार होते. पण, लंडनमधील कोरोना नियमांमुळे भारत अ संघाचा दौरा रद्द झाला आणि दोन सराव सामनेही रद्द करावे लागले. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघाला प्रथम श्रेणी सराव सामना खेळायला मिळाल्यास खेळाडूंना फायदाच होईल, असे कोहलीला वाटतं. परंतु याचा निर्णय प्रवासाचा कार्यक्रम आखणाऱ्या लोकांवर अवलंबून असल्याचेही तो म्हणाला. ''तो निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. या मालिकेपूर्वी आम्हाला प्रथम श्रेणी सराव सामना खेळायचा होता, परंतु तो नाकारण्यात आला आहे. त्यामागचं कारण मलाही माहीत नाही.''
भारतीय खेळाडू सध्या २० दिवसांच्या सुट्टीवर आहेत. १६ किंवा १७ जुलैला ते पुन्हा बायो बबलमध्ये दाखल होतील. त्यानंतर इंग्लंड लायन्स किंवा कौंटी संघासोबत सराव सामने खेळण्या व्यतिरिक्त भारतीय संघ आपापसात चार दिवसीय सराव सामने खेळतील. ECBत्या दृष्टीनं नियोजन करत आहे. पण, विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केल्यानंतर संघाल एक प्रथम श्रेणी सराव सामना खेळण्यास मिळावा, अशा हालचाली बीसीसीआयनं सुरू केल्या आहेत.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बीसीसीआयचे सचिव जय शाह हे ECB चेअरमन इयान व्हॅटमोर आणि CEO टॉम हॅरीसन यांच्याकडे भारतीय संघासाठी सराव सामन्यांचे आयोजन करावे, अशी विनंती करणार आहेत. ECB कडे विनंती करण्यात आली आहे आणि बीसीसीआय सचिवांची ECBच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसांत निर्णय येईल.''