Join us  

"तुझ्याकडे एवढी ताकद कुठून येते?", रोहितनं शतकवीर जैस्वालला विचारला प्रश्न, स्वतःच केला खुलासा

 rohit sharma and yashasvi jaiswal : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 4:46 PM

Open in App

yashasvi jaiswal ipl 2023 । मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने शतकवीर यशस्वी जैस्वालच्या अप्रतिम खेळीचे कौतुक करताना एक खुलासा केला आहे. काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सला पराभूत केले. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात टीम डेव्हिड (tim david) राजस्थानच्या संघासाठी काळ ठरला. तत्पुर्वी, यशस्वी जैस्वालने (yashasvi jaiswal) शानदार शतक ठोकून मुंबईच्या गोलंदाजांना घाम फोडला. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत जैस्वालने एकतर्फी झुंज दिली. जैस्वालने 'यशस्वी' खेळी करून यजमानांचा चांगलाच समाचार घेतला.

सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीचे तोंडभरून कौतुक केले. जैस्वालसारखे फलंदाज पुढे येत आहेत हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले संकेत आहेत. "मी यशस्वी जैस्वालला मागच्या वर्षीही पाहिले होते आणि यावर्षी त्याने आपला खेळ चांगला केला आहे. मी त्याला विचारले की तुझ्यात एवढी ताकद कुठून येते? तो म्हणाला की, तो जिममध्ये जास्त वेळ घालवत आहे. त्याचे टायमिंग जबरदस्त आहे. हे त्याच्यासाठी चांगले आहे. भारतीय क्रिकेट आणि राजस्थान रॉयल्ससाठी देखील ही बाब चांगली आहे", अशा शब्दांत रोहितने युवा खेळाडूच्या शतकी खेळीला दाद दिली. 

मुंबईचा ३ चेंडू अन् ६ गडी राखून विजय काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद २१२ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ६२ चेंडूत १२४ धावांची शानदार शतकी खेळी केली. २१३ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला सुरूवातीला मोठे धक्के बसले. कर्णधार रोहित शर्मा (३) धावा करून वादग्रस्त निर्णयाचा शिकार ठरला. तर इशान किशनला (२८) रविचंद्रन अश्विनने बाहेरचा रस्ता दाखवला. मग कॅमेरून ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला आणि विजयाकडे कूच केली. ग्रीनने ४४ तर सूर्याने २९ चेंडूत ५५ धावांची अप्रतिम खेळी केली. अखेरच्या काही षटकांमध्ये तिलक वर्माने सावध खेळी करत टीम डेव्हिडला साथ दिली. डेव्हिडने १४ चेंडूत ४५ धावा करून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. मुंबईने १९. ३ षटकांत २१४ धावा करून आपल्या कर्णधाराला वाढदिवसादिवशी विजयी भेट दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App