Join us

युवराज सिंगच्या वडिलांचे धोनीवर गंभीर आरोप; सिक्सर किंगचा जुना व्हिडीओ व्हायरल, उत्तर मिळालं?

युवराज सिंगच्या वडिलांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीवर टीकेचे बाण सोडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 19:43 IST

Open in App

yograj singh dhoni : भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगच्या वडिलांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीवर टीकेचे बाण सोडले. महेंद्रसिंग धोनी याने लेकाचे अर्थात युवराज सिंगचे करिअर उद्धवस्त केले, असा आरोप याआधीही योगराज सिंग यांनी केला आहे. पुन्हा ही गोष्ट बोलून दाखवत धोनीला कधीही माफ करणार नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. जे सध्या चांगलेच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आपल्या मनातील धोनीवरील राग व्यक्त केला. अशातच आता युवराज सिंगचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या वडिलांविषयी बोलताना दिसतो आहे. 

काही दिवसांपूर्वी युवराज सिंगला एका पॉडकास्टवर त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना युवराज म्हणाला, "माझ्या वडिलांची मानसिक स्थिती चांगली नाही. ते हे मान्य करायला तयार नाहीत. त्यांनी या विषयावर लक्ष द्यायला हवे, असे मला वाटते, पण ते हे मान्य करू इच्छित नाहीत." युवराजच्या या व्हिडीओचा दाखला देत चाहते आपल्या लाडक्या माहीच्या बाजूने बोलत आहेत. (Yuvraj Singh on Father Yograj Singh Mental Issue)

धोनीवर आरोप करताना योगराज सिंग म्हणाले की, मी धोनीला कधीच माफ करणार नाही. धोनीने स्वत:चा चेहरा आरशात जाऊन पाहावा. तो एक मोठा क्रिकेटर आहे. पण त्याने युवराज सिंगसोबत जे केले त्याबद्दल त्याला कधीच माफ करू शकत नाही. त्याच्यासोबत जो चुकीचा वागतो त्याला मी कधीच माफ करत नाही. मग तो घरचा असो नाहीतर बाहेरचा. धोनीने युवराजचे आयुष्य उद्धवस्त केले. तो आणखी चार पाच वर्षे सहज खेळला असता. त्याच्यासारख्या खेळाडूला जन्म देणे हे सोपे नाही.

आपल्या नव्या मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्यावरही राग काढला आहे. १९८१ मध्ये भारतीय संघातून बाहेर काढल्यापासून कपिल देव यांच्यासोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत, असे ते म्हणाले. कपिल देव यांच्या तोडीस तोड असल्यामुळेच संघाबाहेर काढले, असा आरोपही त्यांनी केला. तसेच माझ्या मुलाने १३ ट्रॉफी जिंकल्या असे म्हणत युवराज सिंगचा दाखला देत त्यांनी कपिल देव यांना टोला मारला. एवढेच नाही तर युवराज सिंगला भारतरत्न मिळायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :युवराज सिंगमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड