Join us  

केकेआरसाठी पंजाबविरुद्ध ‘करा अथवा मरा’ लढत

गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये आज, शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 7:04 AM

Open in App

इंदूर : गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये आज, शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. केकेआरसाठी ही लढत ‘करा अथवा मरा’ अशा धर्तीची आहे.जर गेल्या लढतीत कुठल्या संघाला १०२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला तर झटपट पुनरागमन करणे सोपे नसते, पण केकेआर संघाला मात्र आता सावरण्यासाठी अधिक वेळ नाही. त्यांची लढत फलंदाजीची बाजू मजबूत असलेल्या संघाविरुद्ध आहे.केकेआरने ११ सामन्यांत १० गुणांची कमाई केली असून दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील संघाला प्लेआॅफसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा कायम राखण्यासाठी शनिवारच्या लढतीत कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे.किंग्स इलेव्हन पंजाब संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध १५ धावांनी पराभव पत्करावा लागल्यामुळे अडचणीत सापडला आहे. त्यानंतर फ्रेन्चायझीची सहमालकिण प्रीती झिंटा व क्रिकेट संचालक वीरेंद्र सेहवाग यांच्यादरम्यान वाद झाल्याचे वृत्त आहे. फ्रेन्चायझीने त्याबाबत अधिकृत वृत्त प्रकाशित करताना त्याचे खंडन केले आहे.किंग्स इलेव्हनने १० सामन्यांत १२ गुणांची कमाई केली आहे. त्यांनी आणखी एक विजय मिळवला तर त्यांना प्लेआॅफच्या उंबरठ्यावर पोहचता येईल, पण पराभव स्वीकारावा लागला तर मात्र त्याचा मार्ग खडतर होईल.किंग्ज इलेव्हनतर्फे के.एल. राहुलसाठी (१० सामन्यांत ४७१ धावा) यंदाचे सत्र शानदार ठरले तर क्रिस गेलने (७ सामन्यांत ३११ धावा) फॉर्मात असल्याचे सिद्ध केले आहे. अन्य फलंदाजांची त्यांना योग्य साथ न मिळणे हा संघासाठी चिंतेचा विषय आहे. करुण नायर (१० सामन्यांत २४३ धावा) आपली भूमिका चोख बजावली आहे, पण मयंक अग्रवालची (९ सामन्यांत ११८ धावा) कामगिरी निराशाजनक ठरली आहे. अग्रवालने स्थानिक मोसमात खोºयाने धावा वसूल केल्या होत्या.अनुभवी युवराजला ७ सामन्यात केवळ ६४ धावा करता आल्या. त्यामुळे संघव्यवस्थापनाने त्याला अंतिम ११ मधून वगळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या स्थानी संधी मिळालेल्या मनोज तिवारीलाही छाप सोडता आलेली नाही.दुसºया बाजूचा विचार करता केकेआरने संघाच्या निवडीबाबत काही आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले. त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. रिंकू सिंगला चार सामन्यात संधी देण्यात आली, पण उत्तर प्रदेशच्या या फलंदाजाला त्याचा लाभ घेता आला नाही. नितीश राणा (२४० धावा) आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवर चाचपडत असल्याचे दिसून आले. गोलंदाजीमध्ये पीयूष चावला व कुलदीप यादव महागडे ठरल्यामुळे केकेआर संघाला झळ बसली आहे. शनिवारच्या लढतीसाठी शुभमान गिल व शिवम मावी फिट व्हावे, अशी केकेआर संघाला आशा आहे. ख्रिस लिन व रॉबिन उथप्पा यांना कामगिरीत सातत्य राखण्यात आलेले अपयश केकेआर संघासाठी आणखी एक चिंतेचा विषय आहे. सुनील नरेनने (२०२ धावा १३ बळी) आपली छाप सोडली आहे, पण आंद्रे रसेलला मात्र सुरुवातीच्या काही लढतींचा अपवाद वगळता लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

टॅग्स :आयपीएल 2018कोलकाता नाईट रायडर्सकिंग्ज इलेव्हन पंजाब