गुवाहाटी : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर पडताच भारतीय संघाचे संतुलन बिघडले असले तरी येथे रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या निर्धाराने संघ खेळेल. भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात केल्यास मायदेशात त्यांच्याविरुद्ध हा पहिला मालिका विजय ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात बुमराहची भूमिका निर्णायक ठरू शकली असती मात्र, तो आता विश्वचषक खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका टीम इंडियाच्या तयारीला मूर्त रूप देण्यासाठी आयोजित करण्यात आली. मात्र, बुमराहच्या अनुपस्थितीमुळे कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांचा संघात समावेश करण्यात आला; पण दोघेही विश्वचषक संघात नाहीत. सर्वांनाच मोठा प्रश्न पडला आहे की, बुमराहऐवजी घेण्यात आलेल्या गोलंदाजाला तपासून पाहण्यास पुरेशी संधी असेल. विश्वचषक संघात राखीव असलेला मोहम्मद शमी कोविडमुक्त झाला असला तरी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत नाही. शमीला ऑस्ट्रेलियातील स्थितीची कल्पना असल्याने त्याची विश्वचषक संघात निवड होऊ शकते. दीपक चाहरदेखील राखीव खेळाडूत आहे; पण द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आले. त्रिवेंद्रमच्या पहिल्या सामन्यात चाहर आणि युवा वेगवान अर्शदीपसिंग यांनी पाहुण्या संघातील फलंदाजांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे हा सामना भारताने सहज जिंकला देखील.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू अधिक स्विंग होत नाही, असा अनुभव आहे. अशावेळी भुवनेश्वर आणि अर्शदीप किती प्रभावी ठरतील? विश्वचषकाआधी वेगवान माऱ्यातील उणिवा दूर करण्याचे अवघड आव्हान व्यवस्थापनापुढे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"