गॉल, दि. 27 - श्रीलंके विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 600 धावांचा डोंगर उभा केला आहे. श्रीलंकेच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर करुणारत्नेच्या रुपाने श्रीलंकेला 7 धावांवर पहिला झटका बसला. उमेश यादवने (2) धावांवर करुणारत्नेला बाद केले. पहिल्या दिवशी सलामीवीर शिखर धवन (190) धावा आणि चेतेश्वर पूजाराने (153) भक्कम सुरुवात करुन दिल्यामुळे भारताला 600 धावांचा पल्ला गाठता आला.
पहिल्या दिवशी 3 बाद 399 धावा करणा-या भारताला दुस-या दिवशी फक्त 201 धावाच करता आल्या. गुरुवारी अजिंक्य रहाणे (57), हार्दिक पांडयाची अर्धशतके आणि अश्विनच्या (47) धावा दुस-या दिवशीच्या खेळाचे वैशिष्टय ठरले. श्रीलंकेचा नुआन प्रदीप यशस्वी गोलंदाज ठरला त्याने 31 षटकात 132 धावा देत सहा फलंदाजांना माघारी धाडले.
बुधवारी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यावेळी अभिनव मुकुंदच्या रुपात संघाला पहिला धक्का बसला. नुवान प्रदीपने मुकुंदला 12 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मात्र धवनने पुजाराच्या साथीने लंकेच्या गोलंदाजांना धुवून काढले. शानदार शतकी खेळी करणाऱा धवन आणि पुजाराने दुसऱ्या गड्यासाठी 253 धावांची भागीदारी केली. जबरदस्त फटकेबाजी करत असलेल्या धवनचे द्विशतक दहा धावांनी हुकले. त्याला 190 धावांवर प्रदीपने बाद केले. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीच्या रूपात प्रदीपने भारताला तिसला धक्का दिला. त्यानंतर पुजाराने खेळपट्टीवर पाय रोवत श्रीलंकेला अधिक यश मिळवू दिले नाही.
त्यादरम्यान त्याने आपले शतकही पूर्ण केले. पुजारा आणि रहाणेने चौऱ्या विकेटसाठी अभेद्य 113 धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 3 बाद 399 धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या दिवशी श्रीलंकेकडून नुवान प्रदीपने तीन बळी टिपले. गॉलच्या या मैदानावर भारताला दोन वर्षांपूर्वी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता; पण त्यानंतर भारतीय संघाने कामगिरीत सातत्य राखताना जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
विराट कोहली अँड कंपनी २०१५ मध्ये गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक असेल. त्या वेळी चौथ्या दिवशी १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ११२ धावांत संपुष्टात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत बरेच काही बदलले आहे. युवा व आक्रमक कोहली आता परिपक्व झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६-१७च्या मोसमात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध १७ पैकी १२ कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.