आगरकर विश्वचषकाच्या योजनेसाठी विंडीजला जाणार

द्रविड, रोहित यांच्यासोबत बैठक : बुमराहच्या फिटनेसचा घेणार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 05:45 AM2023-07-19T05:45:53+5:302023-07-19T05:46:31+5:30

whatsapp join usJoin us
Agarkar will go to West Indies for World Cup plans | आगरकर विश्वचषकाच्या योजनेसाठी विंडीजला जाणार

आगरकर विश्वचषकाच्या योजनेसाठी विंडीजला जाणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली ५ ऑक्टोबरपासून  होणाऱ्या वन-डे विश्वचषकात टीम इंडियाची योजना काय असावी, यासाठी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर हे लवकरच वेस्ट इंडीजला जाणार आहेत. तेथे मुख्य कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत रणनीतीवर चर्चा करतील. याच बैठकीदरम्यान दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज लोकेश राहुल यांच्या फिटनेसचा देखील आढावा घेतला जाईल.

विंडीजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. दुसरा सामना २० जुलैपासून सुरू होईल. या दरम्यान निवड समिती सदस्य सलिल अंकोला हे संघासोबत आहेत. कसोटी मालिका आटोपताच ते भारतात परतणार असून, आगरकर हे वन-डे मालिका सुरू होण्याआधी विंडीजमध्ये जातील.  भारताला विश्वचषकात पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. संघ कसा असावा, निवडीत कुणाचा विचार करायला हवा, या गोष्टींवर तिघांमध्ये चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वृत्तानुसार आगरकर हे विश्वचषकासाठी २० खेळाडूंचा पूल तयार करू इच्छितात. यावर चर्चा करण्यासाठी ते २७ जुलैपासून सुरू होत असलेल्या वन-डे मालिकेआधी त्रिनिदाद येथे दाखल होणार आहेत.

विश्वचषकासाठी संघात कोणत्या बाबींवर भर असायला हवा, यावर गंभीर चर्चा करण्यासाठी आगरकर  जाणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने नुकतीच चीनमध्ये होणाऱ्या आशियाडसाठी भारतीय पुरुष संघाची निवड केली.  विंडीजमध्ये कर्णधार, कोच आणि मुख्य निवडकर्ते यांच्यात जी चर्चा होईल, त्यात जसप्रीत बुमराह केंद्रस्थानी असेल.  तो सध्या एनसीएत पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करीत असून, नेटमध्ये गोलंदाजीच्या सरावात व्यस्त आहे.  सोबतच राहुलदेखील फलंदाजीच्या सरावात व्यस्त दिसतो.

सूर्याला संघात स्थान?
आशियाडसाठी जो १५ सदस्यांचा संघ निवडण्यात आला, त्यात मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव याचे नाव नाही. सूर्याला आगरकर यांनी विश्वचषकासाठी राखीव ठेवले असावे, असे मानले जात आहे, कारण आशियाड आणि विश्वचषक एकाचवेळी होणार असल्याने आशियाड खेळणारे खेळाडू विश्वचषक खेळू शकणार नाहीत. सूर्याने वन-डे कारकिर्दीत विशेष कामगिरी केलेली नाही. २३ एकदिवसीय सामन्यांत त्याच्या ४३३ धावा आहेत. यादरम्यान त्याने केवळ दोनदा अर्धशतकी खेळी केली. अशावेळी त्याला वन-डे विश्वचषक संघात स्थान देणे निवड समितीची घोडचूक ठरू शकते.

रिफरच्या जागी सिंक्लेअर वेस्ट इंडीज संघात 
पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडीज संघाने गुरुवारपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी रेमन रिफर याच्याजागी अष्टपैलू खेळाडू केविन सिंक्लेअर याला संघात स्थान दिले आहे. वेस्ट इंडीजसाठी सात एकदिवसीय आणि सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या सिंक्लेअरला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची प्रतीक्षा आहे. डोमिनिका येथे भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत डावाच्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यानंतर वेस्ट इंडीजने सिंक्लेअर याला रिफरच्या जागी समाविष्ट करून संघात एकमेव बदल केला आहे. मात्र, जखमी खेळाडूला पर्याय म्हणून रिफर संघासोबत असेल. बांगलादेशविरुद्ध वेस्ट इंडीज ए संघात यावर्षी झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत सिंक्लेअर सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला होता. झिम्बाब्वे येथे झालेल्या आयसीसी विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठीही तो वेस्ट इंडीज संघाचा सदस्य होता. विंडीजचा संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे.    

Web Title: Agarkar will go to West Indies for World Cup plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.