लंडनः पाहुण्या ऑस्ट्रेलियाची दे दणादण धुलाई करत ४८१ धावांचा डोंगर उभारून इंग्लंडनं मंगळवारी विश्वविक्रम रचलाय. स्वाभाविकच, त्यांच्या या झंझावाती खेळीचं क्रिकेटविश्वात भरभरून कौतुक होतंय. पण, इंग्लंडचे फलंदाज कांगारुंचा खरपूस समाचार घेत असताना, 'साहेबां'च्याच देशात भारत-अ संघाच्या तडफदार शिलेदारांनी लिसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबला वाईट्ट चोपून काढत ४५८ धावा कुटल्या. त्याचा पाठलाग करताना यजमानांचा खेळ १७७ धावांत खल्लास झाला.
रणजी स्टार मयांक अग्रवालचं दीडशतक, सलामीवीर पृथ्वी शॉचा शतकी शो आणि अंडर-१९ वर्ल्ड कपचा हिरो शुभमन गिलच्या ८१ धावांच्या जोरावर भारत-अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ४५८ धावा केल्या. सर्वाधिक धावसंख्या रचणाऱ्या 'अ' संघांच्या यादीत आता टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर पोहोचलीय. त्यात सरे क्लब अव्वल स्थानी असून त्यांनी २००७ मध्ये ओव्हलवरील सामन्यात ४९६ धावांचा डोंगर रचला होता.
भारत - अ संघाकडून पृथ्वीनं ९० चेंडूत १३२ धावांची खेळी केली. त्यात २० चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तर, मयांक अग्रवालनं १८ चौकार आणि पाच षटकार ठोकत १०६ चेंडूत १५१ धावा फटकावल्या. १० षटकांत ९१ धावा देऊन २ विकेट घेणारा जाविद हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यावरून, भारतीय वीरांनी इतरांची काय अवस्था केली असेल, याचा अंदाज बांधता येईल.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. ५० षटकांत ६ बाद ४८१ अशी विश्वविक्रमी धावसंख्या उभारून त्यांनी आपलाच ४४४ धावांचा विक्रम मोडला.