ओव्हल : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना म्हणजे केवळ ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत नसून, भारतीय गोलंदाजांची अग्निपरीक्षा देखील आहे. सध्या इंग्लंडच्या धरतीवर या महत्त्वाच्या लढतीचा थरार रंगला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. मोहम्मद सिराज वगळता कोणत्याच भारतीय गोलंदाजाला ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यात फारसे यश आले नाही. सिराजने चार बळी घेऊन भारताची लाज राखील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड (१६३) आणि स्टीव्ह स्मिथ (१२१) यांनी शतकी खेळी केली अन् कांगारूच्या संघाने ४६९ पर्यंत मजल मारली.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांना अपयश आल्याचे दिसले. पण मोहम्मद सिराज याला अपवाद ठरला. त्याने चार बळी घेऊन कांगारूच्या संघाला ४६९ धावांपर्यंत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात १२१. ३ षटकांत ४६९ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. याशिवाय रवींद्र जडेजाने एक बळी घेतला. भारतासाठी हिरो ठरलेल्या सिराजने आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या गोलंदाजीतील आक्रमकतेबद्दल भाष्य केले आहे.
माझ्या गोलंदाजीसाठी आक्रमकता खूप महत्त्वाची - सिराज आयपीएलमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सिराजने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. "भारतीय संघातून खेळेन असे वाटले नव्हते. मी माझ्या पदार्पणाच्या सामन्यात पाच बळी घेतले. आयपीएल २०२३ चा हंगाम चांगला राहिला आणि त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला", असे सिराजने म्हटले. तसेच माझ्या गोलंदाजीसाठी आक्रमकता खूप महत्त्वाची असून त्यामुळेच मला यश मिळते, असेही त्याने सांगितले.
खेळत राहा, खेळत राहा...! 'अजिंक्य' लढतीत रहाणेने शार्दुलला मराठीतून केलं मार्गदर्शन, VIDEO
दरम्यान, तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३६.३ षटकांत ४ बाद १२३ धावा केल्या आहेत. मार्नस लाबूशेन (४१) आणि कॅमेरून ग्रीन (७) धावा करून खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताकडून रवींद्र जडेजाला (२) तर मोहम्मद सिराद आणि उमेश यादव यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाकडे आताच्या घडीला २९६ धावांची आघाडी आहे.