IND vs AUS 1st ODI : 'आशियाई किंग्ज'चा किताब पटकावल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडत आहे. शुक्रवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण या मालिकेनंतर काही दिवसांतच ५ ऑक्टोबरपासून वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यामध्ये त्याने मालिका आणि खेळाडूंशी संबंधित अनेक पैलूंबद्दल भाष्य केले. वन डे क्रिकेटमध्ये सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या सूर्यकुमार यादवचा मात्र त्यांनी बचाव केला.
राहुल द्रविड यांनी सांगितले की, आम्ही सूर्यकुमार यादवला पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आम्हाला खात्री आहे की त्याला वन डेतील कामगिरी सुधारण्यात यश येईल. पहिल्या दोन सामन्यांत त्याला संधी दिली जाईल. तसेच २७ सप्टेंबरची काळजी करण्याची काहीच गरज नाही. आम्ही या आधारावर वन डे संघ निवडलेला नाही. विश्वचषकाच्या संघात सूर्यकुमार नक्कीच आहे. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देतो कारण त्याच्यातील गुणवत्ता आणि क्षमता आपण पाहिली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो प्रभाव पाडतो. तो सामन्याचा निकाल बदलू शकतो, त्यामुळे आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. "विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वी वरिष्ठ खेळाडूंनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ताजेतवाने राहावे अशी संघातील सहकाऱ्यांची इच्छा आहे म्हणूनच रोहित आणि विराटला विश्रांती देण्यात आली, असेही द्रविड यांनी सांगितले.
अश्विनची वन डे संघात एन्ट्रीस्टार फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनचे तब्बल दीड वर्षानंतर वन डे संघात पुनरागमन झाले आहे. अश्विनचा अनुभव आमच्यासाठी चांगला असल्याचे द्रविड यांनी नमूद केले. तो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत चांगले योगदान देऊ शकतो. दुखापतीची समस्या असल्यास तो नेहमी चांगला पर्याय असायचा. त्याच्यासारखा अनुभवी खेळाडू संघात असणे खूप गरजेचे असते, असे भारतीय प्रशिक्षकांनी स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या २ सामन्यांसाठी भारतीय संघ -लोकेश राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
अखेरच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
भारत आणि ऑस्ट्रेलिया वन डे मालिका
- पहिला सामना - २२ सप्टेंबर - मोहाली
- दुसरा सामना - २४ सप्टेंबर - इंदौर
- तिसरा सामना - २७ सप्टेंबर - राजकोट