icc odi world cup 2023 : भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे माजी खेळाडू आपापली मतं मांडत आहे. वन डे विश्वचषकात एकदाही भारताला पराभूत करण्यात शेजाऱ्यांना यश आलं नाही. त्यामुळे शनिवारी होणारा सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा असेल. वन डे विश्वचषकात उद्या भारत आणि पाकिस्तान अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने देखील पत्रकार परिषद घेऊन रणनीती सांगताना शुबमन गिल खेळणार असल्याचे संकेत दिले. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान म्हणजे अफगाणिस्तान नाही, असे म्हणत सामन्याबद्दल भाकित केले.
भारतीय संघ सर्व बाजूंनी मजबूत असल्याची कबुली यावेळी अख्तरने दिली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अख्तरने म्हटले, "भारतीय संघ मजबूत आहे, त्यांच्याकडे चांगल्या फलंदाजांची फळी आहे. भारताची मधली फळी लयमध्ये असून गोलंदाजांनी देखील आपली चमक दाखवली आहे. दुसरीकडे पाकिस्तानी संघही तगडा आहे. बाबर आझम मोठा फलंदाज असून उद्या चांगला खेळेल अशी मला आशा आहे. फखर झमानची लय बसली तर तो २० षटकांत १५० धावा करू शकतो. बघूया उद्या काय होते ते."
दरम्यान, वन डे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दोन्हीही संघ प्रत्येकी २-२ सामने जिंकून इथपर्यंत पोहचले आहेत. यजमान भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला, तर पाकिस्तानने नेदरलॅंड्स आणि श्रीलंकेला पराभूत करून यजमानांशी भिडण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. खरं तर वन डे विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला कधीच भारताविरूद्ध विजय मिळवला आलेला नाही. त्यामुळे टीम इंडिया देखील शेजाऱ्यांविरूद्धचा विजयरथ कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.
Web Title: Ahead of IND vs PAK match in icc odi world cup 2023 Shoaib Akhtar warns Indian team that Pakistan is not Afghanistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.