IND vs AUS, Mind Games: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही संघ नागपुरात पहिला कसोटी सामना खेळणार असून त्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वी माजी खेळाडू खेळपट्टीबाबत वक्तव्य करत होते आणि आता ऑस्ट्रेलियन मीडियानेही भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.
भारतातील खेळपट्ट्यांवर अनेकदा स्पिन ला पोषक ट्रॅक असतो, त्यामुळेच बाहेरून येणाऱ्या संघांना येथे विजय मिळवणे कठीण असते. या वेळीही तेच घडण्याची अपेक्षा आहे कारण ऑस्ट्रेलियाला फिरकीची भीती वाटते. ऑस्ट्रेलियाला गेल्या दोन दशकांपासून भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नसल्याने ही भीती दिसून येत आहे, असे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटले आहे. आता ऑस्ट्रेलियन मीडियाने खेळपट्टीबाबत भारतावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. नागपूर कसोटीत नक्की कोणत्या खेळपट्टीचा वापर होणार याची चित्रे आता समोर येऊ लागली आहेत. दोन दिवसांपूर्वीपर्यंत खेळपट्टीवर गवत दिसत होते, त्यानंतर ऑस्ट्रेलिया शांत होते, पण खेळपट्टीवरील गवत काढून सामन्याच्या आधी रोलर फिरल्याचे दिसत असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाचे म्हणणे आहे.
ऑस्ट्रेलियाच्या फॉक्स क्रिकेटने आरोप केला आहे की, भारताने खेळपट्टी आधीच कोरडी करून घेतली आहे, जेणेकरून पहिल्या दिवसापासून चेंडू स्पिन होऊ शकेल. फॉक्सने याला टीम इंडियाचे षडयंत्र म्हटले असून भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कट रचल्याचा आरोप केला आहे. केवळ ऑस्ट्रेलियन मीडियाच नाही तर माजी खेळाडूही खेळपट्टीबाबत बोलत असल्याचे दिसत आहे. भारताने मालिकेत योग्य खेळपट्टी दिली तर ऑस्ट्रेलिया जिंकू शकते, असे विधान इयान हिली यांनी केले आहे. पण खेळपट्टीत त्रुटी राहिल्यास मालिकेबाबत काही सांगता येणार नाही, असेही त्यांनी म्हटलें आहे. तसेच इयान हिली व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ आणि इतर काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही अशीच विधाने केली आहेत.