दरबन : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा रविवारपासून सुरू होत आहे. टी-२० सामन्याद्वारे मालिकेची सुरुवात होत असून, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शुक्रवारी कसून सराव केला. भारतीय खेळाडू पोहोचले, तेव्हा पावसाने त्यांचे स्वागत झाले होते. आज मात्र, कोवळ्या उन्हात संघाचे दमदार सराव सत्र गाजले.
बीसीसीआयने सोशल मीडियावर फोटो शेअर केला. त्यात प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत खेळाडू मैदानावर दिसत आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा, तसेच जसप्रीत बुमराह यांनी टी-२०, तसेच वनडे मालिकेतून माघार घेतली. हे सर्व जण पहिल्या कसोटीआधी संघात परतणार असून, १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे अखेरचा टी-२० सामना खेळला जाईल. १७ डिसेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होईल, तर कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरुवात होणार आहे. एकूण ४७ खेळाडू जवळपास एक महिना दक्षिण आफ्रिकेत राहतील. या दरम्यान, रिंकू सिंग, जितेश शर्मा, ऋतुराज गायकवाड हे युवा चेहरे संघात खेळताना दिसतील.
रवींद्र जडेजा, दीपक चाहरची प्रतीक्षाभारताचा पहिला सामना एक दिवसावर आला तरी संघाचा उपकर्णधार रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि सलामीवीर शुभमन गिल हे तीन खेळाडू संघापासून अद्याप दूर आहेत. दीपक चाहरच्या वडिलांना मस्तिष्काघात झाल्यामुळे तो घरी परतला. त्याने राहुल द्रविड यांच्यासोबत संपर्क साधला असून, वडिलांची तब्बेत बरी झाल्यानंतरच दक्षिण आफ्रिकेकडे प्रस्थान करणार असल्याचे कळविले आहे. जडेजा युरोपात आहे तो शनिवारी दरबनमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. गिल सुटी आटोपून येथे पोहचला आहे.
टी-२० सामन्यांची वेळ बदललीभारत- द. आफ्रिका संघात रविवारपासून सुरू होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या वेळेत बदल झाला आहे. भारतीय वेळेनुसार पहिला सामना सायंकाळी ७.३० पासून तर उर्वरित दोन सामने रात्री ८.३० पासून खेळले जातील.
पहिली टी-२० लढत १० डिसेंबर सायं. ७.३० दरबन.दुसरी टी-२० लढत १२ डिसेंबर रात्री ८.३० केबेरा.तिसरी टी-२० लढत १४ डिसेंबर रात्री ८.३० जोहान्सबर्ग.