लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने चौकारांच्या फरकानं बाजी मारताना जेतेपदाचा मान पटकावला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला हा सामना निर्धारीत 50 षटकांत 241-241 असा आणि सुपर ओव्हरमध्ये 15-15 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. या स्पर्धेत भारताच्या रोहित शर्मानं ( 648) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये, तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कनं ( 27) सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावलं. बांगलादेशच्या शकिब अल हसननेही 606 धावा आणि 11 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठीची चुरस यांच्यात रंगेल असे वाटले होते, परंतु यांच्यापैकी एकालाही तो मान मिळाला नाही.
इंग्लंडच्या विजयात 'परप्रांतियांचा' मोठा वाटा, जाणून घ्या कसा!
भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले असले तरी रोहित शर्मानं ही स्पर्धा गाजवली. त्यानं 9 सामन्यांत 5 शतकांसह 648 धावा केल्या आहेत आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हानही उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले तरी मिचेल स्टार्क सर्वाधिक 27 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यानं 10 सामन्यांत 27 विकेट घेतल्या आहेत.
इंग्लंडचा जोफ्रा आर्चरचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे. त्याने पदार्पणातच धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो 20 विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
बांगलादेशचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले असले तरी त्यांच्या शकीब अल हसनने ही स्पर्धा अविस्मरणीय बनवली. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू असलेल्या शकीबनं 8 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत, शिवाय 606 धावाही चोपल्या आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत 600 धावा आणि 10+ विकेट अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हाही या शर्यतीत होता आणि त्यानं बाजी मारली. त्यानं 10 सामन्यांत 578 धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम विलियम्सनने स्वतःच्या नावावर केला. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक 548 धावांचा विक्रम श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेच्या ( 2007) नावावर होता. पण, आता हा विक्रम विलियम्सनच्या नावावर झाला आहे.
यंदाच्या स्पर्धेत कर्णधार म्हणून 500 धावांचा पल्ला पार करणारा तो दुसरा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचने 507 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 442 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: Ahead of Rohit Sharma and Mitchell Starc, Kane Williamson become a Player Of The Series in ICC World Cup 2019
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.