Join us  

अहमदाबादची खेळपट्टी सुमार दर्जाची, ICC चा दणका; वर्ल्डकपचा अंतिम सामना इथेच झाला

वानखेडेच्या खेळपट्टीचा दर्जा ‘उत्तम’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 5:37 AM

Open in App

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील त्या खेळपट्टीला सुमार दर्जा दिला, ज्या खेळपट्टीवर १९ नोव्हेंबर रोजी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळविण्यात आला होता.

ऑस्ट्रेलिया- दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथे दुसरा उपांत्य सामना झाला. हा सामना ज्या खेळपट्टीवर झाला त्या ईडन गार्डनवरील खेळपट्टीलादेखील सुमार संंबोधले आहे. आयसीसी मॅचरेफ्री आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी ईडनच्या आउटफिल्डला अतिशय उत्तम संबोधले.

आयसीसी मॅच रेफ्री आणि झिम्बाब्वेचे माजी फलंदाज ॲण्डी पायक्रॉफ्ट यांनी अहमदाबादच्या मैदानाचा बाह्य भाग खूप चांगला असल्याचे निरीक्षण नोंदविले. फायनल खेळविण्यात आलेली खेळपट्टी मात्र मंद होती, असे त्यांनी अहवालात लिहिले आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला ६ गड्यांनी नमविले होते. भारताला ५० षटकांत अवघ्या २४० धावांत रोखल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत लक्ष्य गाठले. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने १२० चेंडूत १३७ धावा ठोकल्या होत्या.

भारताने साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. ज्या मैदानावर हे सामने खेळले गेले त्या क्रमश: कोलकाता, लखनौ, अहमदाबाद आणि चेन्नईच्या खेळपट्ट्यादेखील ‘सुमार’ दर्जाच्या होत्या, असे आयसीसीने म्हटले आहे. भारताने मुंबईच्या वानखेडे मैदानावर उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा ज्या खेळपट्टीवर पराभव केला त्या खेळपट्टीला मात्र उत्तम रेटिंग मिळाले आहे. या सामन्याआधी मीडिया वृत्तात भारताने खेळपट्टी बदलल्याचा दावा करण्यात आला होता. हा सामना नव्या खेळपट्टीऐवजी आधीच्या सामन्यासाठी उपयोगात आणलेल्या खेळपट्टीवरच झाल्याचे सांगण्यात आले.

नियम काय सांगतो...आयसीसीच्या नियमानुसार खेळपट्टीवर चेंडूची असमान उसळी असेल, सीमची हालचाल कमी होत असेल आणि चेंडू थांबून किंवा हळुवार बॅटवर येत असेल अशा खेळपट्ट्यांना ‘सुमार’ दर्जाचे संबोधले जाते. अशा खेळपट्ट्यांवर चेंडू थोडाफार वळण घेतो, पण फिरकीपटूंना पुरेसा लाभ मिळत नाही.

टॅग्स :ऑफ द फिल्ड