Join us  

SA T20: चौकार-षटकारांचा पाऊस... १२ चेंडूत कुटल्या ६० धावा! झंझावाती शतक ठोकत केला विक्रम

मार्करमच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर संघाचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 9:13 AM

Open in App

Aiden Markram, SA T20: षटकारांची बरसात अन् चौकारांचा पाऊस.... दक्षिण आफ्रिकेच्या टी२० लीग स्पर्धेत फलंदाजाने बॉलर्सना असा काही चोप दिला की प्रतिस्पर्धी संघांची पळता भुई थोडी झाली. SA20 स्पर्धेत हा धमाकेदार प्रकार घडला. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत सनरायझर्स इस्टर्न कॅप आणि जोहान्सबर्ग सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात सनरायझर्सच्या वतीने कर्णधार एडन मार्करमने झंझावाती शतक झळकावलं. या सामन्यात सनरायझर्स इस्टर्न कॅपने प्रथम फलंदाजी केली आणि सामन्यात मार्करामची एन्ट्री झाली, तेव्हा संघाच्या २ विकेट फक्त १० धावांवर पडल्या होत्या. पण मार्करम क्रीजवर आला आणि त्याने तुफान फलंदाजी केली.

५८ चेंडूत ठोकलं शतक

एडन मार्करमला आधीपासूनच खेळपट्टीचा अंदाज असल्यासारखा तो खेळला. त्याने आल्याआल्या फटकेबाजीला सुरुवात केली आणि टी२० मध्ये झंझावाती शतक ठोकत टी२० मधील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. एडन मार्करामने ५८ चेंडूत १०० धावा केल्या. ७९ मिनिटांच्या या धडाकेबाज खेळीत ६ षटकार आणि ६ चौकारांचा समावेश होता. चौकार आणि षटकारांची बेरीज केली तर मार्करमने त्याच्या स्फोटक शतकादरम्यान केवळ १२ चेंडूत ६० धावा कुटल्या. हे त्याच्या टी२० कारकिर्दीतील एकमेव शतक आहे. याचाच अर्थ, ही त्याची सर्वोत्तम धावसंख्याही ठरली.

मार्करमच्या खेळीमुळे संघाचा विजय

मार्करमच्या शतकाच्या जोरावर सनरायझर्सने २० षटकांत ५ गडी गमावून २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात जोहान्सबर्ग सुपर किंग्जने २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न १४ धावांनी तोकडे पडले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासह जोहान्सबर्ग सुपर किंग्जचा प्रवास SA20 स्पर्धेमधला प्रवास संपुष्टात आला.

टॅग्स :टी-20 क्रिकेट
Open in App