Aiden Markram Umran Malik, IPL 2022 SRH vs PBKS: IPL च्या यंदाच्या हंगामात सलामीचे दोन पराभव झेलल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने रविवारी तुफानी कमबॅक करत विजयाचा चौकार लगावला. पंजाबविरूद्ध SRH ने सात गडी आणि सात चेंडू राखून सहज विजय मिळवला. लियम लिव्हिंगस्टोनच्या (Liam Livingstone) अर्धशतकानंतर हैदराबादच्या उमरान मलिकने भेदक मारा करत पंजाबला १५१ धावांवर रोखले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पूरन (Nicolas Pooran) आणि एडन मार्करम जोडीने अप्रतिम फलंदाजी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
पंजाबचा नियमित कर्णधार मयंक अग्रवाल संघात नसल्याने हंगामी कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन दोघे सलामीला आले. धवन ८ तर प्रभसिमरन १४ धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टो (१२) आणि जितेश शर्मा (११) हे दोघेही स्वस्तात बाद झाले. लियम लिव्हिंगस्टोनने मात्र शाहरुख खानच्या साथीने दमदार भागीदारी केली. शाहरूख खान २६ धावांवर माघारी परतला. पण लियम लिव्हिंगस्टोनने अर्धशतक ठोकले. त्याने ३३ चेंडूत ६० धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात ओडियन स्मिथकडून अपेक्षा होती. पण उमरान मलिकने २०व्या षटकात तीन बळी आणि एक रन आऊट करत पंजाबला १५१ धावांतच रोखले.
प्रत्युत्तरात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन स्वस्तात बाद झाला. राहुल त्रिपाठी (३४) आणि अभिषेक शर्मा (३१) चांगली सुरूवात मिळाल्यानंतर मध्येच बाद झाले. पण त्यानंतर एडन मार्करम आणि निकोलस पूरन या विदेशी जोडीने संघाला मजबूत स्थितीत नेले. या दोघांनी ७५ धावांची नाबाद भागीदारी केली. एडन मार्करमने नाबाद ४१ तर निकोलस पूरनने नाबाद ३५ धावा करत संघाला १८.५ षटकात विजय मिळवून दिला.