विशाखापट्टणम : भारतीय संघ रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या ‘वन डे’त विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेवर ताबा मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. मुंबईत न खेळू शकलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात होणाऱ्या या सामन्यात लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा ही जोडी मुंबईतील कामगिरीची पुनरावृत्ती करेल का, याचीही उत्सुकता आहे. या सामन्यावर पावसाचे सावट मात्र कायम आहे.
वानखेडे स्टेडियमवर कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताने पाच गड्यांनी विजय मिळविला. त्यात राहुलचे नाबाद ७५ धावांचे योगदान होते. जडेजा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आठ महिन्यांनी ‘वन डे’ खेळला. त्याने नाबाद ४५ धावा ठोकल्या. त्याआधी कसदार गोलंदाजी करीत ४६ धावांत दोन बळी घेतल्याने सामनावीर पुरस्कारही जिंकला.
यंदा भारताच्या यजमानपदाखाली वन डे विश्वचषकाचे आयोजन होणार असून, फॉर्ममध्ये परतलेला राहुल आणि फिट जडेजा हे संघासाठी महत्त्वाचे ठरतील. तीन सामन्यांच्या मालिकेतून निवडकर्ते खेळाडूंच्या कामगिरीचे आकलन करू शकतील. काल ३९ धावांत चार फलंदाज गमविल्यामुळे फलंदाजीत सुधारणा करावी लागेल हे टीम इंडियाला कळले असावे.
राहुल-जडेजा यांनी मात्र ६१ चेंडूंआधी विजय मिळवून दिल्याने दोघांचीही उपयुक्तता सिद्ध झाली. रोहितमुळे आघाडीची फळी भक्कम होईल. ईशान किशन, विराट, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव हे काल लवकर बाद झाले होते. मिचेल स्टार्क आणि स्टोयनिसचा वेगवान मारा निर्धास्तपणे खेळण्याचे या सर्वांपुढे आव्हान असेल. चौथ्या स्थानावरील सूर्याची फलंदाजी ही चिंतेची बाब ठरावी. काल त्याने यंदा पाच ‘वन डे’त एकही अर्धशतक ठोकलेले नाही.
गोलंदाजीत मात्र वेगवान मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रभावी मारा केला, त्याच वेळी कुलदीप यादव कमाल करू शकला नव्हता. हार्दिक हा तिसरा गोलंदाज असल्याने गोलंदाजीत बदल होतील, असे वाटत नाही. ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात वेगळे संयोजन अजमाविण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता...वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे या सामन्यात अडथळा येऊ शकतो. वादळाचाही अंदाज आहे. ३१ ते ५१ टक्के पावसाचा अंदाज आहे. याशिवाय आकाश ढगाळ राहील. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत खेळ थांबविला जाऊ शकतो अथवा सामन्याची षटके कमी होऊ शकतात.