Join us  

भारताविरुद्ध संपूर्ण मालिकेत खेळण्याचे ध्येय; विश्वचषकाआधी चुका सुधारण्याची संधी

दुखापतीतून मी आता पूर्णपणे सावरलो असून, तीनही सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्व करण्याविषयी आशावादी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 11:28 AM

Open in App

मोहाली - दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला आता भारताविरुद्धच्या मालिकेतील तीनही सामने खेळण्याचे वेध लागले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना स्वत: कमिन्सने याबाबत वाच्यता केली आहे. तसेच सहकारी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या सामन्यात सोबत नसल्याने काहीसा निराश झालो असल्याची प्रांजळ कबुली कमिन्सने दिली.

तो म्हणाला, “संघातील अनेक खेळाडू दुखापतीतून बरे होऊन या मालिकेत खेळण्यासाठी उतरत आहेत. अशा अवस्थेत भारतासारख्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सुरुवातीपासून अव्वल खेळ करण्याचे खडतर आव्हान संघासमोर असणार आहे. मात्र, विश्वचषकाआधी ही मालिका होत असल्याने चुकांमधून शिकण्याची चांगली संधी ऑस्ट्रेलिया संघाकडे चालून आली आहे. माझ्याबाबतीत सांगायचे झाल्यास मनगटाच्या दुखापतीतून मी आता पूर्णपणे सावरलो असून, तीनही सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्व करण्याविषयी आशावादी आहे. स्टीव्ह स्मिथही या मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्याच्या सोबतीला मार्नस लाबुशेन आल्याने आमच्या काही चिंता दूर झाल्या आहेत. मार्नसचे नाव माझ्या डोक्यात सदैव सुरूच असते. तो एक जबरदस्त खेळाडू आहे.”

झम्पाला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करावी लागेलदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत महागडा ठरलेला ॲडम झम्पा भारताविरुद्धही डेथ ओव्हर्समध्येच गोलंदाजी करताना दिसू शकतो, असे कमिन्सने स्पष्ट केले. तो म्हणाला, “पहिल्या चार गोलंदाजांचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा त्यांनी कुठल्याही टप्प्यात गोलंदाजी करणे अपेक्षित असते. त्यामुळे झम्पालाही आव्हानांसाठी सज्ज राहावे लागेल.”मालिका जिंकायची आहे, पण...भारताविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आम्हाला जरूर जिंकायची आहे. पण, विश्वचषक तोंडावर असल्याने कुठलाही खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त होऊ नये याची खबरदारीही आम्ही घेणार आहोत. भारतात सध्या प्रचंड गरमी आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान खेळाडूंची चांगलीच दमछाक होऊ शकते. खबरदारी  म्हणून प्रत्येक सामन्यात काही खेळाडूंना आराम देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेऊ शकते.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाभारत