Join us  

कोहलीच्या उपस्थितीत मालिका विजयाचे लक्ष्य, अफगाणिस्तानविरुद्ध दुसरी टी-२० लढत आज

मोहालीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाण संघाचा ६ गडी राखून पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 8:51 AM

Open in App

इंदूर : अफगाणिस्तानविरुद्ध पहिलीच टी-२० मालिका जिंकण्यास भारतीय संघ उत्सुक असून, रविवारी येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळविण्यासह मालिका खिशात घालण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. युवा खेळाडू या सामन्यातील कामगिरीसह संघात स्थान पक्के करण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत. मोहालीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाण संघाचा ६ गडी राखून पराभव केला. 

जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल या खेळाडूंपुढे मालिका विजयात योगदान देत आगामी टी-२० विश्वचषकासाठी निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याचे आव्हान असेल. जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकाआधीची ही अखेरची टी-२० मालिका आहे.जितेशने ईशान किशनला मागे टाकून यष्टिरक्षक-फलंदाजाच्या शर्यतीत स्वत:ला पुढे नेले. त्याने मधल्या फळीत उपयुक्त खेळी केली. आता आणखी चांगल्या कामगिरीद्वारे तो शर्यतीत राहू इच्छितो. तिलक वर्माबाबत असेच आहे. त्याने मागच्या वर्षी वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत  ३९, ५१ आणि नाबाद ४९ धावा ठोकल्या. मात्र, नंतरच्या १३ डावांत केवळ एकच अर्धशतकी खेळी केली होती.  

२१ वर्षांच्या तिलकला याहून मोठी कामगिरी करावी लागेल; पण विराट कोहली दुसरा सामना खेळणार असल्याने तिलकला स्थान दिले जाईल का, हे पाहावे लागेल. जखमेमुळे वनडे विश्वचषकास मुकलेला अक्षर आता मर्यादितच नव्हे, तर कसोटी सामन्यासाठीही सज्ज झाला आहे. डावखुऱ्या अक्षरचा इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध मोहालीत पहिल्या सामन्यात २३ धावांत २ बळी घेतले होते.  वॉशिंग्टननेदेखील पुनरागमन केले; पण पहिल्या सामन्यात तो प्रभावी ठरला नव्हता.

खेळपट्टी फलंदाजीला पूरकइंदूरची खेळपट्टी फलंदाजीला पूरक मानली जाते. अशावेळी जितेश आणि तिलक यांना संधी मिळाल्यास ते पूर्ण लाभ घेतील.  भारताने अफगाणिस्तानला कमकुवत मानण्याची चूक करू नये. त्यांच्या संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. युवा रहमानुल्लाह गुरबाज, अजमतुल्लाह उमरजई आणि अनुभवी मोहम्मद नबी हे कोणताही मारा फोडून काढण्यास सक्षम आहेत. गोलंदाजीत स्टार राशिद खान नसला तरी त्यांच्याकडे मुजीब उर रहमानसारखा उपयुक्त फिरकीपटू आहे. वेगवान गोलंदाजीत नवीन उल हक आणि फजलहक फारुकी चांगली भूमिका वठवीत आहेत.

सामना : सायंकाळी ७ वाजेपासून

टॅग्स :विराट कोहलीभारत-अफगाणिस्तान