लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सलग दोन कसोटी सामने जिंकल्यामुळे उत्साहित झालेला भारतीय महिला क्रिकेट संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भिडेल. या सामन्यात मर्यादित षटकांतील कामगिरी सुधारण्यासह विजयी लय कायम राखण्यावर भारतीयांचा भर असेल.
भारताने याआधी पहिल्या कसोटीत इंग्लंडचा ३४७ धावांनी पराभव केला. त्यानंतर रंगलेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून कसोटीत पराभव केला. या मालिकेतील सर्व तीनही सामने वानखेडे स्टेडियमवर रंगतील. ऑस्ट्रेलियाला नमविणे सोपे नसल्याची जाणीवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या ५० पैकी केवळ १० एकदिवसीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय नोंदविला असून ४० सामने गमावले. स्थानिक मैदानांवरही भारताचा रेकॉर्ड खराब आहे. भारताने आपल्या मैदानावर जे २१ सामने खेळले त्यापैकी चार जिंकले, तर १७ सामन्यांत पराभव पत्करला.
नवोदितांवर लक्ष
फेब्रुवारी २००७ पासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानांवर ७ सामने खेळला, त्या सर्व सामन्यांत पराभव झाला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात मार्च २०१२ ला दोन एकदिवसीय सामने वानखेडे स्टेडियमवर झाले होते. या मालिकेद्वारे भारताकडे २०२५ च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या तयारीची संधी असेल. या मालिकेसाठी संघात श्रेयंका पाटील, सैका इसाक, मन्नत कश्यप आणि तितास साधू या नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.
सामन्याची वेळ : दुपारी १:३० पासून स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई