मुंबई : न्यूझीलंडविरुध्दच्या आगामी टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरने झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्धची लढत अनिर्णित राखली. अय्यरने ११वे प्रथम श्रेणी शतक झळकावताना अन्य शतकवीर अखिल हेरवाडकरसह १८७ धावांची निर्णायक भागीदारीही केली. विशेष म्हणजे यावेळी श्रेयसने एकाच डावात ९ षटकार मारण्याचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरीही केली. बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमी मैदानावर ‘क’ गटातील झालेल्या या लढतीत श्रेयसने १२४ चेंडूत ११ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी करताना १३८ धावांचा तडाखा दिला. अखिलनेही उपयुक्त खेळी करत २४४ चेंडूत १४ चौकार व ३ षटकारांसह १३२ धावांची शानदार खेळी केली. युवा फलंदाज पृथ्वी शॉ (५) दुसºया डावात झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस - अखिल यांनी १८७ धावांची भागीदारी करुन तामिळनाडू खेळाडूंना चांगलेच दमवले. या दोघांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर मुंबईने सामन्यातील चौथ्या व अंतिम दिवसाअखेर ५ बाद ३७१ धावांची मजल मारली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा उभारल्यानंतर तामिळनाडूने ४५० धावांची मजल मारत निर्णायक ७६ धावांची आघाडी घेतली होती. मुंबईने आपला दुसरा डाव घोषित करताच सामना समाप्त झाला. पहिल्या आघाडीच्या जोरावर तामिळनाडूने ३ गुणांची कमाई केली, तर यजमान मुंबईला मात्र केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. चौथ्या दिवशी १ बाद ८५ धावांवरुन सुरुवात करणाºया मुंबईला श्रेयस - अखिल जोडीने मजबूत स्थितीत आणले. त्यांनी आक्रमक फटकेबाजी करताना तामिळनाडूच्या गोलंदाजांची परीक्षा पाहिली. श्रेयस अय्यर धावबाद झाल्याने ही जोडी तुटली. यानंतर अखिलने सर्व सूत्रे आपल्याकडे घेताना शतक साजरे करुन तामिळनाडू गोलंदाजांना घाम गाळायला लावले. याव्यतिरीक्त सूर्यकुमार यादव (३२), सिध्देश लाड (४०) आणि कर्णधार आदित्य तरे (२०*) यांनी चांगली फलंदाजी केली. सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेऊन वर्चस्व मिळवलेल्या तामिळनाडूसाठी चौथा दिवस अत्यंत खडतर गेला. डावखुरा फिरकी गोलंदाज राहिल शाह आणि विग्नेश के. यांनाच बळी घेण्यात यश आले. मुंबईकरांनी अंतिम दिवशी आपला ‘खडूस’ खेळ करत फलंदाजीचा चांगला सराव करुन घेतला. तामिळनाडूकडून पहिल्या डावात शानदार शतक झळकावलेल्या बाबा इंद्रजित याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. .......................................श्रेयस अय्यरने या सामन्यात आक्रमक शतक झळकावतान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एकाच डावात ९ षटकार ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. जर, अय्यर धावबाद झाला नसता, तर नक्कीच त्याने सचिनचा विक्रम मोडला असता. सचिनने १९९६ साली रणजी स्पर्धेच्या एका सामन्यात ९ षटकार ठोकले होते. दरम्यान, रणजी स्पर्धेत मुंबईकडून एकाच डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. शास्त्री यांनी १९८५ साली वडोदराविरुद्ध १२३ चेंडूत नाबाद २०० धावांची खेळी केली होती. या खेळीमध्ये त्यांनी १३ षटकार मारले होते. दखल घेण्याची बाब म्हणजे याच सामन्यात शास्त्री यांनी तिळक राज यांच्या एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) १०३.१ षटकात सर्वबाद ३७४ धावा. तामिळनाडू (पहिला डाव) : १४२ षटकात सर्वबाद ४५० धावा.मुंबई (दुसरा डाव) : ९५ षटकात ५ बाद ३७१ धावा. (श्रेयस अय्यर १३८, अखिल हेरवाडकर १३२; राहिल शाह २/८६).
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अय्यरचा विक्रमी तडाखा..., मुंबई - तामिळनाडू सामना अखेर अनिर्णित
अय्यरचा विक्रमी तडाखा..., मुंबई - तामिळनाडू सामना अखेर अनिर्णित
न्यूझीलंडविरुध्दच्या आगामी टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरने झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्धची लढत अनिर्णित राखली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 10:42 PM