अफगाणिस्ताननेपाकिस्तानचा धुव्वा उडवत विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून टीम अफगाणिस्तानचं अभिनंदन करण्यात येत आहे. भारतीय चाहतेही अफगाणिस्तानच्या गोलंदाजी आणि फलंदाजीवर फिदा झाल्याचं दिसून आलं. भारतीयांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अफगानला चिअरअप केलं. अखेर, २८३ धावांचा पाठलाग करताना अफगानी फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करत ८ गडी राखून मोठा विजय मिळवला. या विजयानंतर अनेक भारतीयांना १९९६ सालचा विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आठवला. या सामन्यातील अजय जडेजाची खेळी आठवली.
१९९६ च्या विश्वचषक सामन्यातील भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अजय जडेजाने महत्त्वपूर्ण खेळी केली होती. ६ व्या क्रमांकावर आलेल्या अजयच्या तुफानी फटकेबाजीमुळेच भारताने तो सामना जिंकला होता. या सामन्यात अजय जडेजाने २५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार ठोकत ४५ धावांचा अफलातून खेळ केला होता. पाकिस्तानी गोलंदाजांची आणि खेळाडूंची दमछाक केली होती. त्यानंतर, पुन्हा एकदा २०२३ मध्ये अजय जडेजाने पाकिस्तानी खेळाडूंचा विश्वचषक स्पर्धेतच धुव्वा उडवला. अफगाणिस्तानच्या या विजयात अजय जडेजाचंही योगदान आहे. कारण, अजय जडेजा सध्या टीम अफगाणिस्तानचा मेंटर आहे.