मुंबई : भारताविरुद्धच्या मुंबई कसोटीत एका डावात १० बळी घेण्याची कामगिरी न्यूझीलंडच्या एजाज पटेलने केली होती. त्याने ज्या चेंडूने ही कमाल केली तोच चेंडू आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी ही माहिती दिली. मुख्य म्हणजे एजाज पटेलनेही तो चेंडू एमसीएच्या हवाली सुपूर्द करण्यास सहमती दर्शविली आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘एजाज पटेलने वानखेडे स्टेडियमवर जी कामगिरी केली ती अभूतपूर्व होती. आम्हाला याचा अभिमान आहे की त्याने हा विक्रम वानखेडेवर केला. त्यामुळे या ऐतिहासिक स्टेडियमच्या इतिहासात एक मोठ्या कामगिरीची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे एजाज पटेलने आम्हाला हा ऐतिहासिक चेंडू दान केल्याने आम्ही त्याचे नेहमीच ऋणी राहू.’ मुंबईत जन्मलेल्या या डावखुऱ्या फिरकीपटूने जीम लेकर आणि अनिल कुंबळेनंतर एकाच डावात १० बळी घेण्याची किमया केली होती. अशावेळी साधारणत: कुठलाही खेळाडू ज्या चेंडूने विक्रम केला तो चेंडू स्वत:कडे निश्चितच सांभाळून ठेवतो. मात्र, एजाजने तो चेंडू स्वत:कडे न ठेवता एमसीएला देण्याचा निर्णय घेऊन आपल्या मोठ्या मनाचे दर्शन घडविल्याचे पाटील यांना वाटते. एमसीए संग्रहालयाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘हे संग्रहालय मुंबई क्रिकेटचा देदीप्यमान इतिहास जतन करून ठेवण्यात निश्चितच मोलाची भूमिका बजावणार आहे.
एमसीएच्या जवळपास ८० खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले आहे. शिवाय महेंद्रसिंग धोनीचा विश्व विजयाच ऐतिहासिक षटकारही या मैदानावरचा आहे. त्यामुळे हे संग्रहालय उदयोन्मुख खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देणारे ठरू शकते.