रोहित नाईक
MCA Election Result | मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनला सर्वात युवा अध्यक्ष मिळाला असून, अजिंक्य नाईक हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी बाजी मारली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते भूषण पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सचिव अजिंक्य नाईक आणि उपाध्यक्ष संजय नाईक यांच्यात थेट लढत झाली. अजिंक्य नाईक यांना २२१ मते तर संजय नाईक यांना ११४ मतांवर समाधान मानावे लागले. ३७७ मतदारांपैकी ३३५ जणांनी मतदान केले, तर ४२ मतदार अनुपस्थित होते. अजिंक्य नाईक यांनी मोठा विजय मिळवताना संजय नाईकांंचा १०७ मतांनी पराभव केला.
३८ वर्षीय अजिंक्य नाईक यांनी हा विजय दिवंगत अमोल काळे यांचा असल्याचे म्हटले. विजयानंतर ते म्हणाले की, सर्व क्लब, क्रिकेटर्स, शाळा आणि क्लब सेक्रेटरी यांचा हा विजय आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही दु:खाची निवडणूक आहे. त्यामुळे हा अमोल काळे यांचा विजय आहे. त्यांचा वारसा जपण्यासाठी मी लढलो होतो. शरद पवारांसह इतरही पक्षातील नेत्यांचे आभार मानतो. मुंबई क्रिकेटसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेन. रणजी ट्रॉफी आणि भारताच्या राष्ट्रीय संघासाठी खेळाडू पुरवणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. माझ्यासारख्या तरूण सहकाऱ्याला संधी दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो.
महत्त्वाचे मुद्दे
एकूण मतदार - ३७७ मतेएकूण झालेले मतदान - ३३५ मते अजिंक्य नाईक - २२१ मतेसंजय नाईक - ११४ मते
दरम्यान, दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या निधनामुळे रिक्त पदासाठी ही निवडणूक झाली. ट्वेंटी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० जून रोजी काळे यांचे निधन झाले. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.