Ajinkya Rahane, IPL 2022: भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सर्वात आधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील त्याचा खराब फॉर्म चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर त्याला मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत संघाबाहेर करण्यात आले. दरम्यानच्या काळात रणजी ट्रॉफीत अजिंक्यने आपलं नशीब आजमावलं आणि सुरूवातीचा दमदार शतक झळकावलं. पाठोपाठ IPL 2022 मध्येही कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. MS Dhoni च्या CSK विरूद्ध सलामीच्या सामन्यात त्याने दमदार ४४ धावांची खेळी केली. आता KKR चा दुसरा सामना RCBशी होणार आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेला एक मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.
अजिंक्य रहाणे आधी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. पण श्रेयस अय्यरच्या जागी रिषभ पंतला संघाचा कर्णधार केल्यानंतर रहाणेला हळूहळू संघाबाहेर व्हावे लागले. योगायोगाने KKRने श्रेयसला कर्णधार केले आणि रहाणेला संघात घेतले. त्यामुळे अजिंक्य रहाणे पहिल्या सामन्यात संधी मिळाली. त्यानेही संधीचं सोनं केलं. माफक १३२ धावांचा पाठलाग करताना त्याने ६ चौकार आणि १ षटकार खेचत ३४ चेंडूत ४४ धावा केल्या अन् संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. आता दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेने १५ धावांचा टप्पा ओलांडताच तो ४ हजार IPL धावा पूर्ण करेल आणि असा पराक्रम करणारा केवळ नववा भारतीय फलंदाज ठरण्याचा बहुमान त्याला प्राप्त होईल.
दरम्यान, KKRने पहिल्या सामन्यात CSKला ९ चेंडू आणि ६ गडी राखून पराभूत केलं होतं. त्यांचा आजचा सामना RCBशी होणार आहे. RCBने पहिल्या सामन्यात दोनशेपार मजल मारली होती, पण गोलंदाजांच्या हाराकिरीमुळे त्यांना पंजाब किंग्स संघाने पराभूत केले होते.