- स्वदेश घाणेकर
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाबद्दल मी फार काही बोलणार नाही. तसं केलं तर मी मुंबईकराचे फार कौतुक करतोय, अशी टीका होईल - बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी दिलेली प्रतिक्रियेचा अर्थ आज सर्वांना उमगला असावा. विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर टीम इंडियाची फलंदाजाची फळी कमकुवत झाली, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला. पण, याच कमकुवत फौजेला सोबत घेताना अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) जे आज करून दाखवलंय, ते कदाचित विराट असताना घडलंच असतं असं नाही. सलामीवीर मयांक अग्रवालचे ( Mayank Agarawal) अपयश, चेतेश्वर पुजाराची ( Cheteshwar Pujara) दुर्दैवी विकेट अन् हनुमा विहारी ( Hanuma Vihari) याच्याकडूनही वाट्याला आलेली निराशा, या सर्व परिस्थितीत कोणीही सहज टेंशनमध्ये आले असते. पण, अजिंक्य एखाद्या अभेद्य भींतीसारख्या मजबूत इराद्यानं खेळपट्टीवर ठाण मांडून बसला. Well Done Ajinkya!; बॉक्सिंग डे कसोटीत 'हा' इतिहास रचणारा पहिला भारतीय फलंदाज
त्यानं मुंबईकरांचा 'खडूस'पणा काय असतो, हे आज खऱ्या अर्थानं दाखवून दिले. सकाळच्या पहिल्या सत्रात शुबमन गिल व चेतेश्वर पुजारा एका षटकाच्या अंतरानं माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचं काही खरं नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. अनेक क्रिकेट पंडितांनी टीम इंडिया आघाडीपण घेऊ शकत नाही, असा दावा करायला सुरुवात केली. पण, कर्णधाराची जबाबदारी आल्यानं अजिंक्यमध्ये आलेला कणखरपणा त्यांना कदाचित माहित नसावा. एखाद्या सॉलिड हिमपर्वतासारखा तो ऑस्ट्रेलिया गोलंदाजांसमोर उभा राहिला. हिमशिखर जेवढा पाण्यावरती दिसतो, त्याच्या तिप्पट आकार पाण्याखाली असतो. अजिंक्यनेही क्रिकेटची ABCD किती भक्कम आहे, हे दाखवून दिले. नेतृत्व असं करावं...; संघ संकटात असताना अजिंक्य रहाणेनं झळकावलं शतक
सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या हनुमा विहारीला सोबत घेऊन त्यानं अर्धशतकी भागीदारी करून भारताच्या आघाडीचा खरा पाया रचला. हनुमामध्ये त्यानं आत्मविश्वास निर्माण करण्याचं पहिलं काम केलं आणि त्याचा संघाला फायदाच झाला. पण, नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याचा मोह तो आवरू शकला नाही व विकेट गमावून बसला. या मालिकेत पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या रिषभ पंतवरील दडपण अजिंक्यनं कमी केलं. आज चुकलो की संघातील स्थान गमावून बसेन, ही पंतच्या मनातील भीती अजिंक्यनं घालवली. त्यामुळेच पंतनं आत्मविश्वासानं अन् आक्रमक खेळ केला. या दोघांनी ८७ चेंडूंत ५७ धावा जोडल्या आणि त्यातल्या २९ धावा ( ४० चेंडू) पंतने केल्या. पण, पंतचा अनुभव कमी पडला अन् मिचेल स्टार्कच्या आग ओकणाऱ्या चेंडूवर तो बाद झाला.