मुंबईत नाइटलाइफ सुरू व्हावे म्हणून गेली काही वर्षे आग्रही असणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची नुकतीच घोषणा केली. त्यांच्या या संकल्पनेवर विरोधकांकडून टीका सुरू आहे. तज्ज्ञांचीही विविध मतं मांडली आहेत. प्रथमच मंत्री झालेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरणसह पर्यटन मंत्रालयही आहे. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आदित्य यांनी राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पाऊल उचलले होते. विरोधक आदित्य यांच्या निर्णयावर टीका करत असताना भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे यानं कौतुक केले आहे.
महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास व्हावा याकरिता आदित्य यांनी 18 जानेवारीला वन आणि पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावली होती. त्या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी वन आणि पर्यटन विभागाची संयुक्त समिती नेमली. महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्ग संपन्नतेची ओढ जगातील पर्यटकांना लावण्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न असेल, असेही आदित्य यांनी त्या बैठकीनंतर सांगितले होते.
आदित्य ठाकरे यांच्या या निर्णयाचे अजिंक्य रहाणेनं कौतुक केलं. त्यानं ट्विट केलं की,''हा चांगाल पुढाकार आहे. महाराष्ट्रात अनेक सुंदर पर्यटन स्थळ आहेत आणि पर्यटकांना त्याची भुरळ पडेल.''