लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या खराब कामगिरीमुळे भारतीय कसोटी संघातून स्थान गमावलेला माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे रणजी स्पर्धेतून आपली लय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी, त्याने बुधवारी डोंबिवली येथील स. वा. जोशी विद्यालयाला भेट देत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
गेल्या वर्षी आपल्या कर्णधारपदाखाली अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर त्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. गेल्या काही मालिकांमधील अपयशी कामगिरीमुळे त्याने संघातील स्थानही गमावले. बुधवारी अजिंक्यने आपल्या शाळेला भेट दिली. आपल्या या भेटीदरम्यानचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावरही अपलोड केला आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘ज्या ठिकाणी आपले मूळ आहे, अशा जागेला भेट देणे विशेष ठरते. यामुळे तुमचे पाय जमिनीवर राहतात. मी माझ्या कुटुंबासोबत डोंबिवलीला गेलो आणि ही जागा कितीही बदलू दे, माझ्या मनात या जागेचे स्थान आहे तसेच राहणार. यावेळी अजिंक्यसोबत पत्नी राधिका आणि मुलगी आर्याही होते. यादरम्यान जिथे क्रिकेटचे धडे गिरवले, त्या मैदानालाही अजिंक्यने भेट दिली. रणजी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना अजिंक्यने सौराष्ट्रविरुद्ध शतकी खेळी केली.
‘शाळेत अनेक बदल’
अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, मला अनेक वर्षांपासून येथे येण्याची इच्छा होती आणि आज येथे आलो. याच ठिकाणाहून मी सुरुवात केली. शाळेत आता अनेक बदल झाले आहेत आणि येथे पुन्हा येण्याचा अनुभव विशेष ठरला.’ सध्या आयपीएलच्या तयारीत असलेला अजिंक्य यंदा कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळेल.
Web Title: Ajinkya Rahane came in school; In the memory of Dombivali
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.