मोहाली : भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करारामध्ये धक्का बसला आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने मंजूर केलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत या दोन्ही अनुभवी खेळाडूंना खालच्या ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे.
क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या चार ग्रेडद्वारे वार्षिक मानधन मिळते. यानुसार अ (७ कोटी), अ (५ कोटी), ब (३ कोटी) आणि क (एक कोटी) अशा गटवारीनुसार खेळाडूंचे विभाजन करण्यात येते. गेल्या काही सामन्यांमध्ये रहाणे आणि पुजारा यांच्याकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. याआधी दोन्ही खेळाडूंचा अ गटात समावेश होता. मात्र खराब फॉर्ममुळे रहाणे-पुजारावर मोठी टीका झाली आणि त्यानंतर त्यांना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले. नव्या करारानुसार रहाणे-पुजारा यांचा ब गटात समावेश झाला आहे.
साहाची घसरण
स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला मोठा फटका बसला आहे. दुखापतींना सामोरे जात असलेल्या पांड्याची अ गटातून थेट क गटात घसरण झाली आहे. तसेच अनुभवी यष्टिरक्षक ऋद्धिमान साहा भारतीय संघाबाहेर असतानाही त्याला करारात स्थान मिळाले; मात्र त्याचीही घसरण झाली असून, त्याचा ब गटातून क गटात समावेश झाला आहे. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव यांचीही केंद्रीय करारामध्ये घसरण झाली आहे.