भारतीय संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याच्या कसोटी कारकिर्दीवर संकट आहे. सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडणारा अजिंक्य आता रणजी करंडक स्पर्धेत खेळून पुन्हा दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. पण, आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अजिंक्यने पूर्ण लक्ष रणजी करंडक स्पर्धेवर केंद्रीत केले आहे. आता सध्या संघाबाहेर असलेल्या अजिंक्यने मोठा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या २०२०-२१ दौऱ्यावरील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत मानहानिकारक पराभवानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पितृत्व रजेवर गेला. त्यानंतर अजिंक्यने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
त्या दौऱ्यावर विराटसह अनेक प्रमुख खेळाडू नव्हते. तरीही अजिंक्यने युवा शिलेदारांना सोबत घेऊन ही मालिका २-१ अशी जिंकली. पण, याचं क्रेडीत दुसऱ्यांनी घेतल्याचा दावा अजिंक्यने 'Backstage with Boria' या कार्यक्रमात बोलताना केला. ३३ वर्षी अजिंक्यने कुणाचं नाव घेतलं नाही, परंतु या मालिकेत त्याने ऑन फिल्ड काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते आणि त्यामुळे यश मिळालं. पण, श्रेय मात्र दुसऱ्यांनी लाटले, असे तो म्हणाला.
''मी त्या दौऱ्यावर काय केलं, हे मला माहित्येय. मला ते कुणाला सांगण्याची गरज नाही. तो माझा स्वभाव नाही. असे काही निर्णय होते ते मी ऑन फिल्ड किंवा ड्रेसिंग रुममध्ये घेतले होते, परंतु त्याचं श्रेय दुसऱ्यांनीच लाटले. माझ्यासाठी मालिका जिंकणे महत्त्वाचे होते, त्यापुढे या गोष्टी नगण्य आहेत. ती माझ्यासाठी ऐतिहासिक मालिका आहे आणि त्यामुळेच त्याचे महत्त्व विशेष आहे,''असे अजिंक्य म्हणाला.
रहाणे पुढे म्हणाला,'' त्या मालिकेनंतर जे मीडियासमोर जाऊन हा माझा निर्णय होता किंवा तो कलाटणी देणारा कॉल माझा होता, असा दावा करत होते, हे त्यांच्यासाठी आहे. मला माहित्येत की मी कोणते निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचा रिझल्ट काय मिळाला. होय मी संघ व्यवस्थापनाशीही चर्चा केली, परंतु मी जे निर्णय मैदानावर घेतले. त्याचेही श्रेय इतरांनी घेतले. मी स्वतः बद्दल फार बोलत नाही किंवा कौतुकही करत नाही. पण, तिथे मी जे काय केले, ते मला माहीत आहे.''
या मालिका विजयानंतर फिरकीपटू आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला जाळ्यात अडकवून बाद केल्याचं श्रेय माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिलं होतं.
Read in English
Web Title: Ajinkya Rahane claims "someone else" took credit of his crucial decisions on Australia tour, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.