मुंबई : सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. अनेकांनी पुरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवली आहे. त्यात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही मदतीचा हात पुढे केला आहे.
त्यानं लिहीले की,'' आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.''
पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये १०५ बचाव पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत. पूरग्रस्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील बारा बाधित तालुक्यातील २ लाख ४७ हजार ६७८ तर सांगली शहरासह जिल्ह्यातील चार बाधित तालुक्यातील १ लाख ७३ हजार ८९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०८ तर सांगली जिल्ह्यात १०८ तात्पुरता निवारा केंद्र सुरु करण्यात आली आहेत.