Join us  

Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला

mumbai vs Rest of India : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने इराणी चषक जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 3:21 PM

Open in App

mumbai vs rest of india live score | लखनौ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मुंबईचा संघ अजिंक्य राहिला. भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने इराणी चषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. ही स्पर्धा रणजी करंडक विजेता आणि शेष भारत यांच्यात खेळली जाते. सामना अनिर्णित राहिल्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. पहिल्या डावात सर्फराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने तब्बल ५३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अभिमन्यू ईश्वरनच्या १९१ धावांच्या खेळीनंतरही शेष भारतला ४१६ धावाच करता आल्या.

इराणी चषक २०२४ मध्ये मंगळवारपासून मुंबई आणि शेष भारत यांच्यात लढत सुरू झाली. ही लढत लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडली. पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघाला विजयी घोषित करण्यात आले. पहिल्या डावात मुंबईकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या तीन फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही, मात्र कर्णधार रहाणेने (९७) धावांची खेळी करत संघाला पुन्हा सामन्यात आणले, त्याला श्रेयस अय्यरने (५७) चांगली साथ दिली. दुसरीकडे, सर्फराजने द्विशतकी खेळी करुन ऐतिहासिक कामगिरी केली. सर्फराज खानने २२२ धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात २५ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. सर्फराजच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात ५३७ धावांपर्यंत मजल मारली. 

इराणी चषकात मुंबई आणि शेष भारत यांच्यात चुरशीची लढत झाली. पण, सामना अनिर्णित ठरल्याने विजेतेपद मुंबईच्या हाती गेले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचा फायदा झाला. अखेरच्या दिवशी मुंबईकडून पृथ्वी शॉ आणि मोहित अवस्थी यांनी अर्धशतके झळकावली. त्याचवेळी तनुष कोटियनने शानदार शतक झळकावून सामना अनिर्णित केला. पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईला विजयी घोषित करण्यात आले. मुंबईने १५वेळा इराणी चषक उंचावण्याची किमया साधली. रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ रणजी करंडक स्पर्धेतही चॅम्पियन ठरला. 

मुंबईचा पहिला डाव - पृथ्वी शॉ (४), आयुष म्हात्रे (१९), हार्दिक तमोरे (०), अजिंक्य रहाणे (९७), सर्फराज खान (२२२), शम्स मुलानी (५), तनुष कोटियन (६४), मोहित अवस्थी (०), शार्दुल ठाकूर (३६), जुनैद खान (०). (१४१ षटकांत ५३७ धावा)शेष भारतचा पहिला डाव - ऋतुराज गायकवाड (९), अभिमन्यू ईश्वरनच्या (१९१), साई सुदर्शन (३२), देवदत्त पडिक्कल (१६), इशान किशन (३८), ध्रुव जुरेल (९३). (११० षटकांत ४१६ धावा)मुंबईचा दुसरा डाव - पृथ्वी शॉ (७६), आयुष म्हात्रे (१४), हार्दिक तमोरे (७), अजिंक्य रहाणे (९), श्रेयस अय्यर (८), सर्फराज खान (१७), शम्स मुलानी (०), शार्दुल ठाकूर (२), मोहित अवस्थी (नाबाद ५१), तनुष कोटियन (नाबाद ११४). (७८ षटकांत ८ बाद ३२९ धावा) 

टॅग्स :अजिंक्य रहाणेमुंबईऋतुराज गायकवाड