Ajinkya Rahane, IPL 2022 DC vs KKR Live: कोलकाता विरूद्धच्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत २१५ धावा चोपल्या. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर दोघांनीही अर्धशतके ठोकली. तर शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल जोडीने शेवटच्या २० चेंडूत ४९ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीला द्विशतकी मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेला अजिंक्य रहाणे प्रचंड नशिबवान ठरला. जाणून घ्या नक्की काय घडलं.
कोलकाताचे सलामीवीर फलंदाजीसाठी मैदानात आले. मुस्तफिजूर रहमानने पहिला चेंडू टाकला. त्या चेंडूवर रिषभ पंतने मागे झेल पकडला. पंचांनी रहाणेला बाद ठरवले. पण DRSमध्ये तो नाबाद असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पुढचाच चेंडू रहाणेच्या पायावर आदळला. त्यावेळी पंचांनी त्याला LBW बाद ठरवले. पुन्हा DRSमध्ये त्याची बॅट आधी लागली असल्याने तो नाबाद असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे दोन्ही वेळा त्याला पंचांनी बाद ठरवूनही मैदानात कायम राहिला.
गोष्ट इथेच संपली नाही. पुढच्या म्हणजेच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणे फटका खेळायला गेला. पण चेंडू वाईडच्या लाईन जवळ असल्याने अजिंक्यच्या बॅटजवळून चेंडू गेला. सर्व काही साधारण पद्धतीने घडल्यासारखं दिसलं. रिषभ पंतनेदेखील अपील केलं नाही. पण रिप्ले मध्ये त्याची बॅट लागली असल्याचं दिसलं होतं. पण खेळाडूंनी अपीलच केलं नसल्याने अजिंक्य पुन्हा एकदा मैदानात कायम राहिला.