Ajinkya Rahane on Rohit Sharma : लोकांसमोर बोलताना जरा जपूनच शब्द वापरणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी अजिंक्य रहाणे आहे. शांत व संयमी स्वभागाचा अजिंक्य कोणत्या वादातही कधी पडला नाही. पण, नुकतेच त्यानं दिलेल्या एका मुलाखतीत चांगली फटकेबाजी केली. मागील दोन वर्षांपासून फॉर्माशी संघर्ष करणाऱ्या अजिंक्यकडे आता कसोटी संघाचे उपकर्णधारपदही राहिलेले नाही. निवड समितीने ती जबाबदारी आता रोहित शर्माकडे सोपवली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात रोहितकडे उप कर्णधारपद सोपवले गेले. पण, रोहितनं दुखापतीमुळे दौऱ्यातून माघार घेतली आणि ही जबाबदारी लोकेश राहुलकडे सोपवली गेली. अजिंक्य रहाणे संघात असतानाही व्यवस्थापनाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले गेले. रोहितला उप कर्णधार बनवण्याच्या निर्णयाबाबत चर्चा केली होती का, असा सवाल केल्यावर अजिंक्य म्हणाला, चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हा निर्णय घेतला, परंतु त्यांच्या या निर्णयाचा मी आदर करतो.
''तो पूर्णपणे निवड समितीचा निर्णय होता. माझ्या हातात काहीच नव्हते. मी त्या निर्णयाचा सन्मान करतो. रोहित खरंच चांगली कामगिरी करतोय आणि तो संघाचे नेतृत्वची सक्षमपणे सांभाळतोय. मी रोहितसाठी आनंदी आहे. आम्ही दोघं चांगले मित्र आहोत,''असेही अजिंक्य म्हणाला. ''जे माझ्या हातात नाही, मी त्याचा फार विचार करत नाही. तो निवड समितीचा निर्णय होता, त्यांनी मला उप कर्णधार बनवले आणि त्यांनी मला कर्णधारही बनवले. रोहित शर्माला उप कर्णधार बनवण्याचा निर्णयही त्यांचाच होता,'' असेही त्याने पुन्हा म्हटले.
Backstage with Boria या कार्यक्रमात तो म्हणाला,'' लोकं जेव्हा म्हणतात की माझं करियर आता संपलं आहे, तेव्हा मी फक्त हसतो. ज्यांना हा खेळ कळतो ते अशा वायफळ चर्चा कधीच करत नाहीत. कसोटी क्रिकेटमधील माझं योगदान सर्वांना माहित आहे आणि जे या खेळावर प्रेम करतात ते समंजसपणेच बोलतात. मला माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. मी चांगली फलंदाजी करू शकतो आणि अजूनही माझ्यात चांगले क्रिकेट शिल्लक आहे.''
मुंबईच्या रणजी संघात अजिंक्य, पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणारमुंबईचा रणजी संघ - पृथ्वी शॉ ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, आदित्य तरे ( यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, अमन खान, शाम्स मुलानी, तनुष कोटियान, प्रशांत सोलंकी, शशांक अत्तार्डे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्थी, प्रिन्स बदियानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस, अर्जुन तेंडुलकर.