India vs South Africa Test Series : भारतीय संघाने मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला १-०ने पराभूत केले. आता भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. २६ डिसेंबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेआधी रोहित शर्माने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अशा वेळी भारताची मदार केएल राहुल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंवर असणार आहे. पण असं असलं तरीही पाचव्या क्रमांकासाठी भारतीय संघात अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी नक्की कोणाचा समावेश करावा, याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला.
"अंतिम ११ च्या संघात कोणाला निवडायचं याबद्दलचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घ्यायचा असतो. यात महत्त्वाची भूमिका असेल सराव सत्रांची. मालिकेतील पहिला कसोटी सामना नेहमीच महत्त्वाचा असतो. त्यामुळे पहिल्या कसोटीत सर्वोत्तम खेळाडूंना संघात खेळवणं आवश्यक असतं. अशा वेळी सराव सत्रात नेट्समध्ये कोणता फलंदाज जास्त चांगल्या पद्धतीने चेंडू खेळतोय ते पाहायला हवं. काही वेळा संघ व्यवस्थापनाला काळजावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात. मी ११ कसोटी सामन्यात राखीव खेळाडू होतो. त्यानंतर मला अचानक संधी मिळाली कारण मी नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत होतो", असा किस्सा प्रवीण अमरे यांनी सांगितला.
"न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या मायदेशातील कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरने स्वत:चा खेळ दाखवून दिला. चार वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला अखेर टीम इंडियामध्ये कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने पहिल्याच मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली. पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की श्रेयसचा या पहिलाच आफ्रिका दौरा आहे. त्याच्यापेक्षा अनुभवी असलेले अनेक खेळाडू संघात आहेत. अशा परिस्थितीत सध्याच्या घडीला कोणता फलंदाज सर्वात चांगली कामगिरी करू शकेल याचा विचार संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला पाहिजे", असा सल्ला अमरे यांनी दिला.