Join us  

कठीण काळात धोनी नव्हे, 'या' दोघांची मिळाली साथ; अजिंक्य रहाणेने केला खुलासा

Ajinkya Rahane, WTC Final: अजिंक्य राहणे तब्बल १६ महिन्यांनी कसोटी खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 2:29 PM

Open in App

Ajinkya Rahane, WTC Final 2023 IND vs AUS: एक काळ असा होता की अजिंक्य रहाणे भारताच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य असायचा. तो संघाचा उपकर्णधार होता. पण नंतर खराब फॉर्ममुळे त्याला संघातून वगळण्यात आले. रहाणेने हार न मानता शानदार खेळ दाखवत पुनरागमन केले. रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळ दाखवला आणि त्यानंतर आयपीएलमध्येही अप्रतिम खेळ दाखवला. या जोरावर तो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान मिळवू शकला. अनेकांनी रहाणेच्या पुनरागमनासाठी धोनीला श्रेय दिलं. पण आता रहाणेनेच सांगितले आहे की त्याला कठीण काळात नक्की कोणी साथ दिली.

'या' दोघांची मिळाली साथ

रहाणेने भारताकडून शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२२ मध्ये खेळला होता. तो हा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. आता तो तब्बल 16 महिन्यांनंतर परतला आहे. तो काळ रहाणेसाठी खूप भावनिक होता. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याच्या नेतृत्वाखाली त्याने भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून दिली. अशा परिस्थितीत संघाबाहेर जाणे त्याच्यासाठी खूप निराशाजनक होते. हा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता.अशा परिस्थितीत रहाणेला कुटुंबीय आणि मित्रमंडळींची साथ मिळाली, त्यामुळे त्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली आणि तो पुनरागमन करू शकला, असे त्याने सांगितले. रहाणेने बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो त्याच्यासाठी भावनिक काळ होता आणि जेव्हा त्याला संघातून वगळण्यात आले तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याला साथ दिली.

रहाणे म्हणाला की, त्याचे स्वप्न भारताकडून खेळण्याचेच आहे आणि हे त्याने आपल्या कुटुंबाला सांगितले होते. रहाणेने सांगितले की, त्याने त्याच्या फिटनेसवर काम केले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. रहाणेने सांगितले की जेव्हा त्याला संघात परतण्याचा कॉल आला तेव्हा तो आणि त्याच्या कुटुंबासाठी तो खूपच भावनिक क्षण होता.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये रहाणे मुंबईकडून खेळतो. या मोसमात त्याने संघाचे नेतृत्व केले. रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये रहाणेने 11 डावात 634 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 57.63 इतकी आहे. भारताचा कसोटी संघही यावेळी खेळाडूंच्या दुखापतींशी झुंजत आहे. ऋषभ पंत जखमी अवस्थेत आहे. श्रेयस अय्यरलाही दुखापत झाली आहे. अय्यरने रहाणेच्या जागी कसोटी संघात स्थान मिळवले होते. केएल राहुललाही दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत रहाणेला संघात संधी मिळाली आणि त्याचा अनुभव टीम इंडियासाठी महत्त्वाच्या सामन्यात फायदेशीर ठरू शकतो.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेमहेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२३
Open in App