मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने मुंबईच्या अजिंक्य रहाणेवर अन्याय केलाय, असं म्हटलं जातं. अजिंक्यलाही काहीसे असेच वाटत आहे. कारण जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी स्वत:ला सिद्ध केलं आहे, असं अजिंक्यनेच स्पष्ट केलं आहे.
आयपीएल संपल्यावर भारतीय संघ इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठीच्या एकदिवसीय संघात अजिंक्यला स्थान देण्यात आलेले नाही. भारतीय निवड समितीच्या या निर्णयाने अजिंक्य निराश झालेला नाही, तर मी पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करेन, असे त्याचे म्हणणे आहे. अजिंक्य याबाबत म्हणाला की, " वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत मी चार अर्धशतके लगावली होती. मी मालिकावीरही ठरलो होतो. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही मी चांगली कामगिरी केली. माझ्यावर जेव्हा विश्वास ठेवण्यात आला तेव्हा तो नक्कीच मी सार्थकी लावला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये मी पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करेन. "