Join us  

Ajinkya Rahane, Ranji Trophy : अजिंक्य रहाणेचं दिमाखदार अर्धशतक, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; मुंबईचा गोवा संघावर दणदणीत विजय

मुंबईच्या विजयात अजिंक्यसोबतच तनुष कोटियन, शॅम्स मुलाणीचा मोठा वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 2:12 PM

Open in App

Ajinkya Rahane, Ranji Trophy : अजिंक्य रहाणे हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेली वर्षभर सातत्याने संधी मिळूनही अजिंक्यला प्रभाव पाडणारी खेळी करता आली नाही. त्यामुळे त्याला श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर करण्यात आले. अशा परिस्थितीत त्याने मुंबईच्या संघाकडून रणजी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात त्याने दणदणीत शतक ठोकलं. पण दुसऱ्या सामन्यात गोवा विरूद्ध पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे ट्रोलर्सने त्याची प्रचंड खिल्ली उडवली. पण या साऱ्या ट्रोल करणाऱ्या मंडळींना अजिंक्यने दुसऱ्या डावात आपल्या बॅटने उत्तर दिलं.

मुंबईच्या संघाचा पहिल्या डावात १६३ वर ऑल आऊट झाला. त्यानंतर गोवाने ३२७ धावा करत पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात मुंबईकरांनी आपला हिसका दाखवला. अजिंक्य रहाणे, शॅम्स मुलाणी (५०) आणि तनुष कोटियन (९८) यांनी संयमी खेळी करत संघाला ३९५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

अजिंक्यच्या खेळीचं महत्त्व

पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात काय करतो, याकडे साऱ्यांचाच नजरा होत्या. ३ बाद ८७ अशी मुंबईची अवस्था असताना तो मैदानात आला. त्यातच लगेच ९३ या धावसंख्येवर आणखी एक गडी बाद झाला. शंभरीही न गाठलेल्या संघाचे चार महत्त्वाचे गडी बाद झाल्याने अजिंक्यवर जबाबदारी होती. त्याने सर्फराज खानच्या साथीने मुंबईला १७५ धावांपर्यंत पोहोचवलं. अजिंक्यने मोक्याच्या क्षणी १४८ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची अतिशय संयमी खेळी केली. त्यानंतर शॅम्स मुलाणी आणि कोटियन यांनी संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली.

चौथ्या डावात मुंबईकर गोलंदाजांचा भेदक मारा

पहिल्या डावाअखेरीस मोठी आघाडी मिळालेला गोवाचा संघ दुसऱ्या डावात मात्र ११२ धावांवर आटोपला. सामन्याच्या चौथ्या डावात गोवा संघाची फलंदाजी मुंबईकरांचा भेदक मारा झेलू शकली नाही. अमूल्य पांडरेकर याने सर्वाधिक नाबाद २३ धावा केल्या. अर्धशतकवीर शॅम्स मुलाणी गोलंदाजीत कमाल करत ५ बळी घेतले. तर मुंबईच्या दुसऱ्या डावात ९८ धावांची खेळी करणाऱ्या तनुष कोटियनने ३ गडी बाद केले. त्यामुळे मुंबईच्या संघाला तब्बल ११९ धावांनी दणदणीत विजय मिळाला.

टॅग्स :रणजी करंडकअजिंक्य रहाणेमुंबईट्रोल
Open in App