मुंबई : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नुकतीच भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार होईल अशी अपेक्षा होती, परंतु रहाणेला संधी मिळाली नाही. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) कौंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायर संघाकडून खेळण्याची परवानगी मागितली आहे. मे, जून आणि जुलैच्या मध्यंतरात कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळावी म्हणून रहाणेने बीसीसीआयला पत्र पाठवले आहे. शिवाय त्याने एक प्रत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीकडेही पाठवले आहे.
कौंटी क्रिकेटमध्ये चार दिवसांच्या सामन्यात रहाणेला सहभागी व्हायचे आहे. रहाणेचे हे पत्र प्रशासकीय समितीने बीसीसआयचे मुख्या कार्यकारी अधिकारी राहुल जोहरींना पाठवले आहे. या संदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''रहाणेला परवानगी न देण्याचा प्रश्नच येत नाही. याआधी आम्ही विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाला यांना कौंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती. रहाणे हा वर्ल्ड कप संघाचा सदस्य नाही. त्याला कौंटीत चार दिवसीय सामने खेळायचे आहेत. त्याचा भविष्यातील कसोटी मालिकांत त्याला फायदाच होईल.''
वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा