भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या घरी नन्ही परी आली आहे. रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी विशाखापट्टणम येथे होता आणि त्यामुळे त्याला त्वरित मुलीची भेट घेता आली नव्हती. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवून भारतने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर रहाणे त्वरित मुंबईत परतला आणि आपल्या परीला भेटला. सोमवारी त्यानं कन्येसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विटरद्वारे अजिंक्य बाप झाल्याची माहिती दिली होती. भज्जीनं ट्विट करून अजिंक्य रहाणे बापमाणूस झाल्याची गोड बातमी सर्वांना दिली. अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शाळेतील मित्र...ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली. याबाबत त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. पण, या दोघांमधील प्रेम घरच्यांना कळलं होतं आणि त्यांनीच दोघांना एकमेकांशी लग्न कराल का, असे विचारले. या दोघांनीही त्वरीत होकार कळवला. 26सप्टेंबर 2014मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.
चौथ्या डावात 395 धावांच पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 191 धावांत तंबूत परतला. मोहम्मद शमीनं 10.5 षटकांत 35 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. जडेजानंही चार विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. भारताने विजय मिळवून खात्यात आणखी 40 गुण जमा केले आहेत. आता 160 गुणांसह भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना दोन विजय आणि एक अनिर्णित निकालानंतर प्रत्येकी 56 गुणांसह अनुक्रमे पाचव्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका प्रत्येकी 60 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.