भारताचा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे हा बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. एका बाजूला तो आयपीएल आणि काउंटी क्रिकेटमध्ये सक्रीय दिसत असला तरी त्याच्यासाठी टीम इंडियातील परतीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. तो किती वर्षे क्रिकेट खेळणार याचं उत्तर अजून गुलदस्त्यात असलं तरी निवृत्तीनंतर तो काय करणार त्याचा मेगा प्लान ठरला आहे.
क्रिकेटर अजिंक्य राहाणेनं मुख्यमंत्र्यांसह या नेत्यांचे मानले खास आभार
अजिंक्य रहाणेनं एक मोठं स्वप्न सत्यात उतरवण्याचा एक महत्त्वाचा टप्पाही पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर अजिंक्य रहाणेनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. एक्स अकाउंटवरुन शेअर केलेल्या आपल्या या पोस्टमधून त्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. याशिवाय क्रिकेटरनं आपल्या पोस्टमध्ये भाजपचे आमदार आणि बीसीसीआयचे खजीनदार आशीष शेलार यांचाही उल्लेख केला आहे.
अजिंक्य राहणेच्या या आभार प्रदर्शनामागची गोष्ट
सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे परिसरात भूखंड देण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवरच अजिंक्य रहाणे याने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमत्र्यांसह बीसीसीआय खजीनदाराचे विशेष आभार व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. मुंबईत जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी आणि क्रीडा सुविधा उभारण्याच्या संकल्पनेला पाठिंबा दिल्याबद्दल त्याने आभार व्यक्त केले आहेत.
अजिंक्य रहाणेनं खास शब्दांत व्यक्त केल्या भावना
हीअकादमी युवा खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा आणि मार्गदर्शनासह सक्षम करेल, ज्या शहरात माझा स्वतःचा क्रिकेट प्रवास सुरू झाला त्या शहरातील चॅम्पियन्सच्या पुढच्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी तुमच्याकडून देण्यात आलेल्या प्रोत्साहन आणि नेतृत्वाबद्दल मी कृतज्ञ आहे, अशा शब्दांत अजिंक्य रहाणे याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.