Ajinkya Rahane Mumbai Indians, IPL 2022 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या संघाला दोन विजयानंतर अखेर पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने पाच बळी घेत भेदक मारा केला. पण त्याआधीच व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणाने केलेल्या खेळींच्या जोरावर कोलकाताने मुंबईला १६६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव केवळ ११३ धावांत आटोपला. पण या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या बाद होण्याच्या पद्धतीवर चांगलीच चर्चा रंगली.
अजिंक्य रहाणे हा मूळचा उत्तम कसोटीपटू आहे. तो सरळ बॅटने चेंडू टोलवण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. मुंबई विरूद्धच्या सामन्यात त्याने अतिशय संथ सुरूवात केली. २३ चेंडूत २५ धावांवर खेळत असताना, मुंबईचा फिरकीपटू कुमार कार्तिकेय गोलंदाजीसाठी आला. त्या पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स मारण्याचा अजिंक्य रहाणेचा प्रयत्न फसला. रहाणे हा समोर फटके खेळणारा खेळाडू असूनही त्याने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केल्याने मुंबईच्या प्लॅनिंगमध्ये तो फसला. पुढचा चेंडू कार्तिकेयने अतिशय साध्या पद्धतीने अजिंक्यसाठी ऑफ स्पिन केला. तो चेंडू सरळ मारला असता तर अजिंक्यला सहज चौकार मिळू शकला असता. पण त्याने रिव्हर्स स्वीपचा हट्ट न सोडल्याने तो जाळ्यात अडकला आणि क्लीन बोल्ड झाला.
मुंबईच्या जाळ्यात अडकला अजिंक्य रहाणे, पाहा व्हिडीओ-
दरम्यान, सामन्याच्या पहिल्या डावात कोलकाताकडून व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा या दोघांनी प्रत्येकी ४३ धावा केल्या. त्यासोबत काही छोटेखानी भागीदारींमुळे त्यांची धावसंख्या १६५ वर पोहोचली. जसप्रीत बुमराहने IPL कारकिर्दीत पहिल्यांदाच ५ बळी टिपले. प्रत्युत्तरात इशान किशनने ५१ धावांची झुंजार खेळी केली. पण इतर कोणीही चांगली साथ न दिल्याने मुंबईचा डाव ११३ धावांमध्ये आटोपला.