मुंबई - मुंबईचा तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या भारतीय संघाबाहेर आहे. दरम्यान, रहाणेकडे आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ८ ते २५ सप्टेंबरपर्यंत तामिळनाडूमध्ये होणाऱ्या दुलिप करंडक स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणेची पश्चिम विभागाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळलेल्या मुंबईच्या संघातील बहुतांश खेळाडूंची पश्चिम विभागीय संघात निवड करण्यात आली आहे. यामध्ये पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, यशस्वी जयस्वाल, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे, तनुश कोटियान यांचा समावेश आहे. सौराष्ट्रचा अनुभवी खेळाडू जयदेव उनाडकटसोबतच हल्लीच राष्ट्रीय संघात स्थान मिळवणाऱ्या राहुल त्रिपाठीचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, या स्पर्धेसाठी मध्य विभागानेही आपला संघ घोषित केला आहे. यामध्ये रणजी विजेत्या मध्य प्रदेशच्या संघातील खेळाडूंचा भरणा आहे. त्यात शुभमन शर्मा, कुमार कार्तिकेय, व्यंकटेश अय्यर यांचा समावेश आहे.
पश्चिम विभागाचा संघ पुढीलप्रमाणे आहेअजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलाणी, तनुश कोटियान, शार्दुल ठाकूर, राहुल त्रिपाठी, सत्यजित बच्छाव, हेत पटेल, चिंतन गाजा, जयदेव उनाडकट, चिराग जानी, अतित सेठ.