मुंबई - सध्या सलामीवीर अजिंक्य राहणेच्या खेळात सुधारणा झालेली पाहायला मिळतेय. याचे कारण आहे सचिन तेंडुलकर. कुठल्याही क्रिकेटपटूसाठी सचिन तेंडुलकचा सल्ला, मार्गदर्शन एक अमुल्य अनुभव असतो. सचिनकडून मिळालेली एक टीपही आयुष्यभरासाठी उपयोगी ठरते. भारतीय क्रिकेट संघात सतत आत-बाहेर करणा-या अजिंक्य राहणेलाही सचिनच्या मोलाच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे.
अजिंक्यचा आत्मविश्वास उंचावला असून, खेळातही सुधारणा झाली आहे. मुंबईकर अजिंक्य राहणे भारतीय संघात असला तरी, त्याला अजून अंतिम अकरा खेळाडूंमध्ये आपले स्थान पक्के करता आलेले नाही. रोटेशन पॉलिसीनुसार त्याला संधी मिळत असते. रोहित शर्मा, शिखर धवन या दोघांपैकी एकजण जेव्हा जायबंदी होतो किंवा विश्रांती घेतो तेव्हा अजिंक्यला संघात स्थान मिळते.
सहाजिकच या सर्वाचा त्याच्या खेळावर परिणाम होतो. अलीकडेच राहणेने त्याच्या खेळात सुधारणा करण्यासंबंधी सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शन घेतले. बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये सरावा दरम्यान सचिनने अजिंक्यशी संवाद साधला व त्याला भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतील अशा टीप्स दिल्या. अजिंक्यने या भेटीचे फोटो त्याच्या टि्वटर पेजवर अपलोड केले आहेत.
मी बीकेसीमध्ये चार दिवस सराव केला. जेव्हा मी सचिन तेंडुलकरांना भेटलो तेव्हा त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तुला कधी संधी मिळते, कधी मिळत नाही. तुझ्या हातात काय असेल तर ते तयारी करण आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा त्यांनी मला सल्ला दिला. माझ्या तंत्राबद्दल त्यांनी मला काही सांगितले नाही पण मानसिक दृष्टीकोनातून त्यांनी मला मार्गदर्शन केले असे अजिंक्यने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच दमदार कामगिरी करणा-या सचिनने ऑस्ट्रेलियन गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतात ते सांगितले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध कशा प्रकारची तयारी करायची हे त्यांनी सांगितले. एकूणच सचिनने बरोबर बोलून माझा आत्मविश्वास उंचावला असे अजिंक्यने म्हटले आहे.
मुंबईकर अजिंक्य रहाणेवर भारतीय संघात अन्याय होतोय का?सध्या सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी फिट झाली आहे तर तिसऱ्या स्थानावर कर्णधार विराट कोहलीला तोड नाही. मधल्या फळीत के. एल राहुल, मनिष पांड्ये, केदार जाधव आणि धोनी हे फलंदाज आहेत. तर अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्यानं आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवल आहे. निवड समितीला सध्या नक्की काय पाहिजे हे त्यांना तर समजतंय का? कारण संघातील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रोटेशन पद्धतीचा अवलंब करून बाहेर बसवलं जात? मग रहाणेच्या वेळी का कोणत्या सलामीवीराला विश्रांती दिली जात नाही? 2019 चा विश्वचषक इंग्लंडमध्ये आहे आणि रहाणे परदेशात खोऱ्यानं धावा खेचतो हे निवड समितीनं लक्षात ठेवायला हव म्हणजे बरं. नाही तर प्रतिभा असूनही संधी मिळाली नाही म्हणून रहाणेचा मुरली विजय होण्यासाठी वेळ लागणार नाही. तर रहाणेनं मिळालेल्या संधीचं सोन करत आपलं नाणं खणखणीत वाजवायला हवं.