नवी दिल्ली : सध्याच्या जगात जो धावा करतो तोच चांगलाच फलंदाज, असे म्हटले जात. त्या खेळाडूची शैली कशी, त्याचे फटके कसे, यावर जास्त जण भाष्य करताना दिसत नाही. खेळ हा आनंद लुटण्यासाठी असतो, तो हार आणि जीत यांच्या पलीकडे असतो, हे मानणारा वर्ग सध्या कमी होत चालला आहे. पण मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदाच्या जुगात एका क्रिकेटपटूची क्लासिक खेळाडू म्हणून स्तुती केली आहे आणि तो खेळाडू आहे अजिंक्य रहाणे.
अजिंक्यचा आज वाढदिवस आहे. तो 30 वर्षांचा झाला. या त्याच्या वाढदिवशी सचिनने अजिंक्यला शुभेच्छा दिल्या आहेत, त्याचबरोबर त्याची स्तुतीही केली आहे. अजिंक्यबाबत सचिन म्हणाला की, " सर्वात मेहनती, शिस्तबद्ध आणि क्रिकेट गंभारपणे खेळणारे खेळाडू फार कमी आहेत आणि यामध्येच अजिंक्यचा समावेश आहे. सध्याच्या ट्वेन्टी-20च्या जगात क्लासिक खेळाडू म्हणून अजिंक्यचे नाव घेता येईल. अजिंक्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आगामी वर्ष अजिंक्यसाठी चांगले जावो. "
भारतीय संघ अफगाणिस्थानबरोबर 14 जूनला कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची कमान अजिंक्यकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यानंतर भारतीय संघत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दोन महत्त्वांच्या दौऱ्यात अजिंक्यची कामगिरी कशी होती, याकडे साऱ्यांची नजर असेल.