नवी दिल्ली : विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य रहाणेने 10 वर्षांपूर्वी केलेला विक्रम शनिवारी मोडला गेला. उत्तराखंडच्या कर्णवीर कौशलने विजय हजारे स्पर्धेत दुहेरी शतक झळकावून रहाणेच्या विक्रमाला मागे टाकले. या स्पर्धेत द्विशतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात 135 चेंडूंत 202 धावा चोपल्या. या खेळीसह त्याने विजय हजारे चषक स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा रहाणेच्या ( 187 धावा) नावावर असलेला विक्रम मोडला. रहाणेने 2007-08 मध्ये पुण्यात झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाविरुद्ध ही खेळी केली होती.
कौशलने 38 चेंडूंत 50 धावा केल्या, त्यानंतर 71 चेंडूंत शतक, 101 चेंडूंत 150 धावा आणि 132 चेंडूंत दोनशे धावा पूर्ण केल्या. त्याने विनीत सक्सेनासोबत पहिल्या विकेटसाठी 296 धावांची भागीदारी केली. विनीतने 133 चेंडूंत 100 धावा केल्या. लिस्ट A क्रिकेटमधील भारतातील ही सलामीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. याआधी दिल्ली संघाच्या शिखर धवन आणि आकाश चोप्रा यांनी 2007-08 मध्ये पंजाबविरुद्ध केलेली 277 धावांची भागीदारी सर्वोत्तम होती.
कौशलच्या फटकेबाजीच्या जोरावर उत्तराखंड संघाने 50 षटकांत 2 बाद 366 धावा केल्या. 47 व्या षटकात कौशल बाद झाला. 27 वर्षीय कौशलचे हे तिसरे शतक आहे. त्याने सात सामन्यांत 77.83 च्या सरासरीने 467 धावा केल्या आहेत.
Web Title: Ajinkya Rahane's record was broken by a Uttarakhand batsman in Vijay Hazare Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.