सिडनी : अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी सज्ज असल्याचे सिद्ध करताना ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध पहिल्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी झुंजार शतक झळकावित भारत ‘अ’ संघाला दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद २३७ धावांची मजल मारुन दिली.भारताची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची सुरुवातीला ३ बाद ४० अशी अवस्था असताना रहाणे (२२८ चेंडूमध्ये नाबाद १०८ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (१४० चेंडूंमध्ये ५४ धावा) यांनी ७६ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. पहिल्या कसोटी सामन्यानतंर विराट कोहली पितृत्व रजेसाठी मायदेशी परतल्यानंतर या दोन्ही फलंदाजांची जबाबदारी वाढणार आहे. मुंबईचा फलंदाज रहाणेने त्यानंतर कुलदीप यादव (१५) सोबत सातव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी करीत भारत ‘अ’संघाला २०० चा पल्ला ओलांंडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.संघाचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतल. त्याने फुललेंग्थ व आखुड टप्प्यांच्या चेंडूंवर सहज धावा वसूल केल्या. रहाणेच्या खेळीत १६ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे.जवळजवळ ९ महिन्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळणाऱ्या पुजाराला सूर गवसण्यास वेळ लागला नाही. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार लगावले. रविवारी खेळ थांबला त्यावेळी रहाणेची साथ मोहम्मद सिराज (०) खाते न उघडता देत होता.पहिल्या कसोटीमध्ये सलामीवीराच्या स्थानासाठी दावा सादर करीत असलेले शुभमन गिल व पृथ्वी शॉ यांनी निराश केले. दोघेही खाते न उघडता माघारी परतले.कोरोना व्हायरसच्या ब्रेकनंतर प्रथमच खेळत असलेला हनुमा विहारी (१५) फॉर्मात असल्याचे दिसले, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर पुजारा व रहाणे यांनी डाव सावरला. पुजारा पॅटिनसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करीत असलेल्या यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहला खातेही उघडता आले नाही. रविचंद्रन अश्विन (०५) पॅटिनसनचा तिसरा बळी ठरला. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी भारत ‘अ’संघाची ६ बाद १२८ अशी अवस्था होती. त्यानंतर रहाणे व कुलदीप यादव यांनी डाव सावरला. रहाणेने ६१ व्या षटकात पॅटिनसनला अपर कटचा षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले.आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅटिनसनने तीन बळी घेतले. वेगवान गोलंदाज मायकल नेसेरने दोन तर बर्डने १ बळी घेतला. कर्णधार ट्रॅव्हिस हेडने दोन फलंदाजांना माघारी परतवले.
धावफलकभारत ‘अ’ पहिला डाव :- पृथ्वी शॉ झे. पेन गो. पॅटिनसन ००, शुभमन गिल झे. हॅरिस गो. नेसेर ००, चेतेश्वर पुजारा झे. हॅरिस गो. पॅटिनसन ५४, हनुमा विहारी पायचित गो. बर्ड १५, अजिंक्य रहाणे खेळत आहे १०८, रिद्धिमान साहा पायचित गो. हेड ००, रविचंद्रन अश्विन पायचित गो. पॅटिनसन ०५, कुलदीप यादव झे. पुकोवस्की गो. हेड १५, उमेश यादव पायचित गो. नेसेर २४, मोहम्मद सिराज खेळत आहे ००. अवांतर (१६). एकूण ९० षटकांत ८ बाद २३७. बाद क्रम : १-०, २-६, ३-४०, ४-११६, ५-१२१, ६-१२८, ७-१९७, ८-२३५. गोलंदाजी : पॅटिनसन १९-५-५८-३, नेसेर १९-६-५१-२, बर्ड १९-६-३४-१, ग्रीन ८-४-९-०, स्टेकिटी १४-३-५०-०.